

कुडाळ : आजच्या सत्ताधाऱ्यांकडे निवडणुकीसाठी अमाप पैसा येतो कुठून? नोटबंदीनंतरही हा पैसा कसा येतो? तो काळा आहे की पांढरा? असा थेट आणि परखड सवाल करत शिवसेना ठाकरे शिवसेनेचे नेते आ. भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. पुढील पिढीच्या भवितव्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच सज्ज व्हावे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकदिलाने लढाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हा कार्यकारिणी बैठक पार पडली. आ. भास्कर जाधव व खा.अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
आ. भास्कर जाधव म्हणाले, आज किती मतांनी निवडून आलो हे महत्त्वाचे नाही; तर भस्मासूर प्रवृत्तीच्या विरोधात उभे राहिलो, हे महत्त्वाचे आहे. पूर्वी सिंधुदुर्ग, रत्नागिरी एकच जिल्हा होता. या भूमीने विचारवंत, साहित्यिक दिले आहेत. इथली कोकणी माणसे लढवय्यी आहेत. आज जर पैसे वाटून उमेदवार निवडून येऊ लागले, तर समाजाची मोठी अधोगती होईल. ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून पैसे वाटणे हा सत्ताधाऱ्यांचा फंडा आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
पैशाने विकली जाणारी लोकशाही मान्य आहे का? ः अरविंद सावंत
खा. अरविंद सावंत म्हणाले, पैशाने विकली जाणारी लोकशाही तुम्हाला मान्य आहे का? कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. सिंधुदुर्ग आणि मुंबईचे नाते वेगळे आहे. मुंबई आपल्या विचारांच्या ताब्यात राहिली पाहिजे. कोकणने नेहमी विचारधारेचा खासदार दिला आहे. मात्र आज विचारधारेकडून विचार शून्यतेकडे वाटचाल सुरू आहे. तरीही शिवसेना संपलेली नाही; आजही इथे निखारे जिवंत आहेत, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.
कणकवलीतील विजयाने जिल्ह्यात ऊर्जा ः गौरीशंकर खोत
उपनेते गौरीशंकर खोत म्हणाले, संदेश पारकर यांच्या विजयामुळे संपूर्ण जिल्ह्यात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. एकजुटीने लढलो म्हणूनच कणकवलीत विजय मिळाला. विजय हा विजयच असतो. येणाऱ्या निवडणुका ताकदीने आणि एकदिलाने लढू. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. शिवसेनेने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा. माजी आ. वैभव नाईक म्हणाले, सत्ता असते तेव्हा सत्तेसोबत येणारे लोकही असतात. मात्र आपले कार्यकर्ते सत्तेसाठी नाही, तर विचारांशी प्रामाणिक आहेत. पैशासमोरही आपण ताकदीने लढलो असून आपली लढाई व्यर्थ जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी आमदार जीजी उपरकर म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार पैसे न वाटताही विजयी होऊ शकतात, हे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. एकजूट ठेवली, तर सत्ता आपलीच असेल असा विश्वास व्यक्त केला.
संदेश पारकर यांचा सत्कार
कणकवलीचे नूतन नगराध्यक्ष संदेश पारकर तसेच नवनिर्वाचित शिवसेना नगरसेवकांचा पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. एवढी मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन बबन बोभाटे यांनी केले तर आभार नगरसेवक सुशांत नाईक यांनी मानले.