Sindhudurg News : मिठमुंबरी-बागवाडी जेटीवर प्रवेशबंदी; कायाकिंग प्रकल्पाचा वाद चिघळला

मच्छीमार आणि प्रकल्पकर्त्यांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर बंदर विभागाची कारवाई
Sindhudurg News : मिठमुंबरी-बागवाडी जेटीवर प्रवेशबंदी; कायाकिंग प्रकल्पाचा वाद चिघळला
Published on: 
Updated on: 

देवगड : मिठमुंबरी-बागवाडी जेटीवरील कायाकिंग प्रकल्पावरून स्थानिक पारंपरिक मच्छीमार आणि प्रकल्पकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बंदर विभागाने जेटीवरील प्रवेश बंद केला आहे. मंगळवारी सकाळी महाराष्ट्र शासनाच्या बंदर विभागाकडून जेटीवर प्रवेशबंदीचा फलक लावण्यात आला. परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी देवगड पोलीस निरीक्षकांनी केलेल्या पत्रव्यवहारानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, उबाठा युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घटनास्थळी भेट देत कायाकिंग प्रकल्पाच्या परवानग्यांबाबत आणि प्रवेशबंदीच्या आदेशाबाबत बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले.

मिठमुंबरी-बागवाडी जेटीवर कायाकिंग प्रकल्प सुरू करण्याच्या मुद्द्यावरून स्थानिक पारंपरिक मच्छीमार आणि प्रकल्पकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जेटीवरील प्रवेश बंद करण्याबाबत पोलिसांकडून बंदर विभागाला कळविण्यात आले होते. त्यानुसार, मंगळवारी सकाळी जेटीवर कोणालाही प्रवेश करता येणार नाही, अशा आशयाचा फलक लावून प्रवेशबंदी लागू करण्यात आली.

देवगडचे बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर आणि सहाय्यक बंदर निरीक्षक सुहास गुरव यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी सहाय्यक बंदर निरीक्षक योगेश चोडणेकर, बंदर विभागाचे चौकीदार प्रकाश खुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले तसेच पोलीस कर्मचारी आशिष कदम, अनिल कुमार पवार, मनोज राऊत आणि रवींद्र महाले उपस्थित होते. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी जेटी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कायाकिंग प्रकल्पाच्या परवानग्यांवरून नाईक यांचे प्रश्न

जेटीवरील प्रवेशबंदीच्या कारवाईनंतर सुशांत नाईक यांनी स्थानिक मच्छीमारांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन कायाकिंग प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याबाबत विचारणा केली. तसेच, प्रकल्पाच्या परवानगीसंदर्भातील कागदपत्रे आणि प्रवासी जेटी बंद करण्याचा लेखी आदेश दाखविण्याची मागणी केल

केवळ ग्रामपंचायतीच्या ना-हरकत प्रमाणपत्राच्या (एनओसी) आधारे कायाकिंग प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता का, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या विविध विभागांच्या परवानग्यांची पडताळणी करण्यात आली होती का, तसेच डीओटी आणि महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याचे नाईक यांनी सांगितले. प्रकल्पाच्या वैधतेबाबत स्पष्टता येण्यासाठी संबंधित परवानग्यांची कागदपत्रे आणि जेटीवरील प्रवेशबंदीच्या आदेशाची प्रत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, उबाठा युवासेनेचे तालुकाप्रमुख गणेश गावकर, राजाराम आडकर, रमेश तारी, नीलेश तारी, आप्पा नेसवणकर, नारायण तारी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कायाकिंग प्रकल्पावरून स्थानिक मच्छीमार आणि प्रकल्पकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे मिठमुंबरी-बागवाडी जेटीवरील प्रवेश बंद करण्यात आला असून, प्रकल्पाच्या परवानग्या आणि बंदर विभागाच्या कारवाईबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर आता संबंधित विभागांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news