

कणकवली : कणकवली बाजारपेठेतील महादेव रमाकांत घेवारी याच्या मटका बुकी सेंटरवर 21 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांनी स्वतः छापा टाकला होता. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी त्या अड्ड्यावरून जप्त केलेला लॅपटॉप व संशयितांचे मोबाईल व अन्य रेकॉर्डवरून सखोल तपास करत आणखी 63 जणांना सह आरोपी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयितांची संख्या 75 झाली असून, हे सर्वजण कणकवली, मालवण तालुक्यांतील आहेत.
या कारवाईमुळे मटका व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. गुन्हा दाखल संशयितांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्याकडून लेखी हमीपत्र घेतले जाणार आहे. याप्रकरणी आवश्यक तपासाची कार्यवाही पूर्ण करून संबंधित संशयितांना न्यायालयातही हजर केले जाणार असल्याचे तपासी अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर सावंत यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांनी यातील सर्व दोषींवर कारवाई केली जाईल, पोलिसांनी कोणालाही पाठीशी घालू नये, अशा सक्त सूचना देत अड्ड्यावरील लॅपटॉप व संशयितांचे मोबाईल जप्त करण्यास पोलिसांना सांगितले होते.
त्या लॅपटॉपमधील रेकॉर्ड आणि मोबाईलच्या सीडीआरवरून या मटका बुकीशी कोणकोण संबंधित आहेत, कोणाकोणाचे कनेक्शन मटका व्यवसायाशी आहे? कोणकोणत्या भागातून व्यवहार केले जातात, यामध्ये मोठे व छोटे मटका व्यावसायिक कोण? याचा सखोल तपास पोलिसांनी गेल्या पंधरा ते वीस दिवसांत केला. त्यानंतर आणखी 63 जणांवर सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले. आतापर्यंत याप्रकरणी पूर्वीचे 12 आणि आताचे 63 मिळून 75 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच त्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करून संशयितांना न्यायालयात हजर करणार असल्याचे तपासी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सावंत यांनी सांगितले.