

Sindhudurg Election Maratha Reservation
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा आदींसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या मतदारसंघात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना राजकीय पक्षांनी उमेदवारी द्यावी. यात प्राधान्याने मराठा समाजाची स्थानिक मतदार संघात असलेली लोकसंख्या विचारात घेऊन मराठा समाजाचा उमेदवार द्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठा समाज जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी सर्व पक्षांच्या नेतृत्वाला केले आहे.
ॲड.सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकांच्या तारखेची घोषणा झाली. त्यापूर्वी स्थानिक पातळीवर जिल्हा परीषद व पंचायत समिती मतदार संघ निहाय आरक्षण निश्चिती झाली आहे. या निवडणुकाबाबत अखिल भारतीय मराठा महासंघाने धोरण जाहीर केले आहे. या नुसार खुल्या प्रवर्गासाठी निश्चित मतदारसंघात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनाच उमेदवारी द्यावी. यात प्राधान्य मराठा समाजाची स्थानिक मतदार संघात असलेली लोकसंख्या विचारात घेऊन मराठा समाजाला उमेदवारी द्यावी. कारण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना खुला मतदारसंघ सोडून इतर प्रवर्गात निवडणूक लढविता येत नाही. मात्र आरक्षित प्रवर्गाचा उमेदवार आरक्षित मतदारसंघाबरोबरच खुल्या प्रवर्गातूनही निवडणूक लढवू शकतो. यामुळे खुल्या मतदारसंघात किंवा वार्डात अन्य राखीव प्रवर्गातील उमेदवार दिल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होतो, त्याचे राजकीय भवितव्य संपुष्टात येते.