यावर्षीचा आंबा हंगाम संपण्याच्या मार्गावर!

Mango season end: स्थानिक बाजारपेठेतही आंब्याची आवक घटली
End of mango season
कॅनिंगसाठी आलेला आंबा. (छाया : वैभव केळकर)
Published on
Updated on

देवगड ः यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन कमालीचे घटलेले असतानाच मार्केटमध्ये आंब्याचा घसरलेला दर, अंतिम टप्प्यात फळमाशीचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त अशी स्थिती निर्माण झाली असून, आंबा बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आता शेवटच्या म्हणजेच तिसर्‍या टप्प्यातील आंबाही तुरळक असल्याने यावर्षीचा आंबा हंगाम लवकरच संपेल असे बागायतदारांमधून सांगितले जात आहे.

आंब्याचे उत्पादन जेमतेम 25 ते 30 टक्केच

यावर्षी आंब्याचे उत्पादन जेमतेम 25 ते 30 टक्केच राहिले. त्यात दुसर्‍या टप्प्यातील आंबा मोठ्या प्रमाणात एकाच वेळी तयार झाल्याने आंबा काढून तो विक्रीसाठी बाजारपेठेत पाठविण्यासाठी बागायतदारांना कसरत करावी लागली. जानेवारी महिन्यात मोहर आलेला आंबा एप्रिल महिन्यात एकदम तयार झाल्याने आंबा काढण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाल्याने तयार सर्वच आंबा काढणे शक्य झाले नाही, परिणामी काही ठिकाणी कलमांवरच तयार झालेला आंबा गळून जमिनीवर पडल्याने बागायतदारांचे नुकसान झाले. शिवाय एकाच वेळी मोठ्या प्रमाणात आंबा मार्केटमध्ये आल्याने आंब्याचे दर कमालीचे घसरले. पेटीला केवळ 1000 ते 1200 रूपये दर मिळाला, अशी गंभीर स्थिती बागायतदारांवर आल्याचे वरेरी येथील आंबा बागायतदार रूपेश पारकर यांनी सांगितले.

दुसर्‍या टप्प्यातील आंबा संपला

दुसर्‍या टप्प्यातील आंब्याला स्थानिक बाजारपेठेत प्रतवारीप्रमाणे सुरूवातीला डझनी 1 हजार तर त्यानंतर 700, 500रू. असा दर मिळाला. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून बाजारपेठेत आंबा मोठ्या प्रमाणात होता. मात्र आता दुसर्‍या टप्प्यातील आंबाही संपल्याने स्थानिक बाजारपेठांमध्येही आंबा कमी झाला आहे. तर तिसर्‍या टप्प्यातील आंबा तुरळक असल्याने आंबा हंगाम लवकरच संपेल असे आंबा बागायतदार विद्याधर जोशी यांनी सांगितले. फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे हा आंबा कॅनिंगला द्यावा लागतो. मात्र कॅनिंगसाठीही यावर्षी आंबा कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

चाकरमान्यांचा होणार हिरमोड

यावर्षी आंब्याचे घटलेले उत्पादन, मुंबई वाशी मार्केटमध्ये आंंब्याचे कमालीचे घसरलेले दर यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी स्थिती झाली आहे. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात सुट्टी असल्यामुळे पर्यटक, चाकरमानी मंडळी गावात येतात. मात्र त्या प्रमाणात आंबा उपलब्ध नसल्याने खास हापूस आंबा खरेदी करण्यासाठी येणार्‍या पर्यटकांनाही मे महिन्यात आंबा किती उपलब्ध होईल हे सांगता येणार नाही, अशी स्थिती आहे.

सध्या कॅनिंग व्यवसाय सुरू झाला आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे कॅनिंगसाठी आवश्यक आंबाही मिळणे दुरापास्त झाले आहे. सध्या कॅनिंगचा दर 42 ते 44 रूपये किलो आहे. मात्र देवगड तालुक्यातून दिवसाला 60 ते 70 टनच आंबा कॅनिंगला मिळत आहे.

सुधीर तांबे, आंबा व्यावसायिक

यावर्षी आंब्याचे उत्पादन 25 टक्केच झाले.त्यातील दुसर्‍या टप्प्यातच आंबा जास्त प्रमाणात झाला. मात्र तोही आंबा आता संपला असून अनेक बागायतदारांच्या बागांमधील आंबा संपला आहे.तिसर्‍या टप्प्यातील आंबा हा 10 मे ते 27 मे पर्यंत असतो. मात्र तो आंबाही तुरळक असल्याने आंबा हंगाम लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे.

सुधीर जोशी, आंबा बागायतदार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news