Sindhudurg News : श्री दत्तनामाच्या जयघोषाने दुमदुमली माणगावनगरी!

दत्त मंदिरातील श्री मन्युसूक्त दत्तयाग पारंपारिक थाटात
Sindhudurg News
श्री दत्तनामाच्या जयघोषाने दुमदुमली माणगावनगरी!
Published on
Updated on

माणगाव : माणगाव श्री क्षेत्रातील प्राचीन व जागृत श्री दत्त मंदिरात सन 1972 पासून अखंड सुरू असलेल्या श्री गुरुप्रतिपदा उत्सवानिमित्त आयोजित श्री मन्युसूक्त दत्तयाग हा चार दिवसीय भव्य धार्मिक सोहळा भक्तिमय व आध्यात्मिक वातावरणात झाला. प्रत्येक भक्ताच्या तोंडी ‌‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा‌’ हा नाम जप होता, त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते.

परमपूज्य श्री. प. प. नांदोडकर स्वामी महाराज यांनी सुरू केलेल्या या पवित्र परंपरेनुसार 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक, वैदिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाची सुरुवात शनिवार 31 जानेवारी रोजी सकाळी 24 तास अखंड नामस्मरणाने झाली. रविवार 1 फेब्रुवारी रोजी सकाळी नामस्मरण समाप्तीनंतर श्री दत्तप्रभूंच्या जन्मस्थान, समाधी स्थळ, ग्रामदेवता मंदिर येथे अभिषेक व पूजन, पुण्याहवाचन, यज्ञमंडप देवता स्थापना, ग्रह-वास्तु शांतता तसेच हवनादी विधी विधिवत पार पडले. याच दिवशी गुहेवर विशेष श्री सत्यदत्त पूजा झाली. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

या काळात श्री मन्युसूक्त व श्री दत्तमालामंत्र जप, हवन तसेच विविध धार्मिक अनुष्ठाने अखंड सुरू होती. दुपारी व सायंकाळी आयोजित भजन, भक्तिसंगीत, अभंग, शास्त्रीय संगीत व कीर्तन कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दररोज सायंकाळी होणाऱ्या महाआरती व पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसर भारावून गेला. या दत्तयागासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, पुणे, गुजरात आदी भागांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची वर्दळ, नामस्मरण, मंत्रोच्चार व प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळाले. उत्सवाचा समारोप मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी सकाळी श्री दत्त मंदिरात महाअभिषेक, महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, महानैवेद्य, मंत्रपुष्प व महाआरतीने करण्यात आला. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या चार दिवशीय उत्सवात दत्त मंदिर माणगांव ट्रस्टच्या वतीने चांगले नियोजन करण्यात आले होते. या पावन उत्सवात सहभागी सर्व भाविक, कलाकार, सेवेकरी व ग्रामस्थांचे श्री दत्त मंदिर माणगांव ट्रस्ट यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news