

कुडाळ ः मालवण -राजकोट येथील शिवपुतळ्याच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी , जगाला हेवा वाटेल असा पुतळा आम्ही परत उभा करू, अशी ग्वाही देशवासीयांना व शिवप्रेमींना दिली होती. त्यांनी आपला शब्द पूर्ण केला आहे. पूर्वीच्याच जागेवर उभारलेला हा भव्य दिव्य शिवपुतळा पुन्हा लोकांना दर्शनासाठी खुला झाला आहे. हा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्वलंत इतिहसाचा अनुभव घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठिकाण म्हणून भविष्यात ओळखले जाईल, असा आपला ठाम विश्वास असल्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.
मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे त्यांनी रविवारी मुख्यमंत्र्यासमवेत दर्शन घेतले.या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बालत होते. ना.राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिव पुतळ्याचे लोकार्पण केले होते, यानंतर पुतळ्याबाबत दुर्दैवाने दुर्घटना घडली. त्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेत, जगाला हेवा वाटेल असा पुतळा उभारण्याचा विश्वास दिला होता. हा शब्द पूर्ण करत या पुतळ्याच्या पूजनासाठी मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहिले आहेत.
या पुतळ्याकडे पहाणार्या प्रत्येकाला राष्ट्रभक्ती व धर्मशक्तीची प्रेरणा मिळते. युद्धाच्या आवेशातील महाराजांची आवेशमुद्रा पाहिल्यानंतर ऊर्जेचा स्त्रोत अनुभवायला मिळतो. ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’,‘ स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या दर्जाचा हा पुतळा आहे. या पुतळ्याच्या बाजूला काही जागा आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे की, या पूर्ण परिसरामध्ये दर्जेदार व भावी पिढीला मार्गदर्शक अशी शिवसृष्टी तयार करावी.
यानुसार शिवसृष्टीचे चांगले डिझाईन तयार केले आहे,त्याचे सादरीकरण कॅबिनेट स्तरावर होणार आहे व लवकरच ही शिवसृष्टीही लोकांसाठी खुली होणार आहे. तसेच समोरच्या भागात समुद्रात एका जेटीही महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून बांधण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली? याची माहिती भावी पिढीला देण्याचे व छत्रपती शिवरायांचा ज्वलंत इतिहास दाखवण्याचे काम महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही करणार आहोत. हे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. शिवरायांचे आशीर्वाद घेऊनच हे सरकार सत्तेवर आले आहे. हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असल्यामुळे व छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असल्यामुळे त्यांच्याच प्रेरणेने आपण सगळे काम करत असल्याचे ना. राणे म्हणाले.