

कुडाळ : मालवण शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतले. या प्रवेशामुळे मालवण शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. प्रवेशकर्त्यांचा यथोचित सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.मालवण शहरात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अपेक्षित अशी भाजपा पक्ष संघटना बांधणी करून देऊ अशी ग्वाही माजी नगरसेवक मंदार केणी यांनी श्री. चव्हाण यांना दिली.
मुंबई येथील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होती.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मालवण शहरमधील पदाधिकारी माजी बांधकाम समिती सभापती मंदार केणी, माजी नगरसेवक यतीन खोत, माजी आरोग्य समिती सभापती दर्शना कासवकर, शाखाप्रमुख भाई कासवकर, उपशहरप्रमुख नंदा सारंग, नितीन पवार, शाखाप्रमुख सई वाघ, युवासेना उपशहरप्रमुख अमल घोडावले, शाखा प्रमुख संजय कासवकर, माजी नगरसेविका सेजल परब, अशोक कासवकर यांनी प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
आ. रवींद्र चव्हाण म्हणाले, आज मालवण नगरपालिका क्षेत्रातील पदाधिकार्यांचा भाजपात प्रवेश होत आहे. या सर्वाचे भाजपात स्वागत करीत आहोत. माझे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे आणि पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस, खा.नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच सर्वच भाजपा पदाधिकारी या सर्वाच्या नेतृत्वात मालवणमधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मालवण तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने या सर्वानी भाजपात प्रवेश केला आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या प्रवेशकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. मालवणसह जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्या विश्वासाने तुम्हा सर्वानी भाजपात प्रवेश केला आहे, त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही, असे श्री.चव्हाण यांनी प्रवेशकर्त्यांना आश्वासित केले.
कोकणचा सर्वागीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी येत्या काळात तेथील तरूणांचे होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी कोकणात रोजगार निर्मिती होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत आम्ही मिशन हाती घेणार आहोत. येणार्या काळात सर्व गोष्टींना न्याय कसा मिळेल, याला आमचे प्राधान्य राहील, असे आ. चव्हाण यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना सांगितले.
आम्ही जेव्हा रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती, तेव्हा झालेल्या चर्चेअंती पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविले आहे. आम्ही तेव्हा विरोधी पक्षात होतो. परंतु त्यांची कामाची कार्यशैली आणि झालेली विकासकामे निश्चितच जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची आहेत. आम्ही विरोधी पक्षात असलो तरी त्यांनी आम्हाला सन्मानाची वागणूक दिली. मालवण शहरासह जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून भाजप करणार आहे. तसेच आ. रवींद्र चव्हाण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार आहेत, असा विश्वास माजी नगरसेवक मंदार केणी यांनी या प्रसंगी व्यक्त केला.