Sindhudurg News : मान्सूनपूर्व तयारी, मालवण महसूल प्रशासन ॲक्शन मोड वर!

एनडीआरएफकडून शोध व बचावकार्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण; कोळंब येथे बचाव
Monsoon News
मान्सूनपूर्व तयारी, मालवण महसूल प्रशासन ॲक्शन मोड वर!
Published on
Updated on

मालवण : आगामी मान्सून हंगामांत संभाव्य पूर, अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीजन्य परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी मालवण तालुका महसूल प्रशासनाने मान्सूनपूर्व तयारीला वेग दिला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या मार्गदर्शनाखाली कोळंब कायाकिंग पॉईंट येथे तालुक्यातील उपलब्ध बचाव बोटींची तपासणी तसेच शोध व बचाव (सर्च ॲण्ड रेस्क्यू) मोहिमेबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणा दरम्यान एनडीआरएफच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी आपत्ती प्रसंगी नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुटका, लाइफ जॅकेट व इतर बचाव साहित्याचा योग्य वापर, बोटीद्वारे बचावकार्याची पद्धत तसेच आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमधील समन्वय कसा राखावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी बचावकार्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करून विविध तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले.

मान्सूनकाळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास तातडीने मदतकार्य राबविता यावे, यासाठी तालुक्यातील सर्व बचाव बोटींची तांत्रिक तपासणी करण्यात आली. बोटींची कार्यक्षमता, सुरक्षितता, इंधन उपलब्धता तसेच आवश्यक बचाव साहित्याची पूर्तता याची पडताळणी करण्यात आली. संभाव्य संकटाच्या वेळी यंत्रणा तत्पर राहावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या.

तहसीलदार गणेश लव्हे यांनी प्रशिक्षणाचा आढावा घेतला. ते म्हणालेे, संभाव्य पूर, अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करून त्यांना वैद्यकीय सेवा व इतर आवश्यक मदत उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण करून आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री सज्ज ठेवण्यात येत आहे. एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली झालेले हे प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. महसूल प्रशासन, एनडीआरएफ, पोलीस विभाग, ग्रामपंचायती, आरोग्य विभाग तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून मान्सून काळात प्रभावी आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे कोणतीही 'आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कोकण किनारपट्टीवर दरवर्षी मान्सून काळात उद्भवणाऱ्या आव्हानांचा विचार करता, अशा प्रकारचे प्रशिक्षण आणि पूर्वतयारी नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

प्रशासनाकडून सज्जता

महसूल तसेच सर्व प्रशासनाने आपापल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडायच्या आहेत. याबाबत आवश्यक त्या सूचना त्या-त्या वेळी देण्यात येणार आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपत्तीकाळात सर्व विभागांना सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार गणेश लव्हे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news