

मालवण : येथील दांडी परिसरात जुन्या वादातून दोन गटात झालेल्या भीषण हाणामारीने खळबळ उडाली आहे. दांडेश्वर मंदिर परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या या वादात लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि होडीच्या वल्ह्याचा वापर करण्यात आला. दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फिर्यादी युवराज नितीन तोडणकर (19, रा. वायरी मोरेश्वरवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील स्कुबा डायव्हिंग करून समुद्रकिनाऱ्यावर परतले असताना आरोपी सुजल संतोष केळुसकर, संतोष केळुसकर आणि रोहित केळुसकर यांनी त्यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद घातला. आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना बिअरच्या बाटलीने, दांड्याने आणि लोखंडी रॉडने मारून गंभीर दुखापत केली. याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या युवराज तोडणकर यांनाही आरोपींनी शिवीगाळ व मारहाण केली. तसेच भांडण सोडवण्यास आलेल्या महिला साक्षीदारांचा विनयभंग केल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे.
मालवण पोलिसांनी याप्रकरणी सुजल केळुसकर, संतोष केळुसकर, सुहास कोयंडे, जयेंद्र शिरपुटे यांच्यासह 8 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सुजल संतोष केळुसकर (21, रा. दांडी अपराधवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घटनेची सुरुवात दुपारी 2 च्या सुमारास झाली.
सुजल आपल्या मित्रासह दुचाकीवरून जात असताना समोरून दुचाकीवरून येणाऱ्या युवराज तोडणकर याने कट मारला. यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. युवराजच्या वडिलांनी त्याला ठार मारण्याची धमकी देऊन दांडेश्वर मंदिराखाली बोलावले. सुजल आपल्या कुटुंबासह तिथे गेला असता आरोपी नितीन तोडणकर याने होडीच्या वल्ह्याने सुजलचे काका महादेव केळुसकर यांच्या खांद्यावर आणि सुजलच्या हातावर वार करून जखमी केले. तसेच सुजलची बहीण आणि आई यांनाही मारहाण करण्यात आली असा आरोप तक्रारीत आहे. या झटापटीत गळ्यातील सोन्याची साखळी गहाळ झाल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध धोकादायक शस्त्रांनी गंभीर दुखापत करणे. बेकायदेशीर जमाव जमवणे आणि दंगल करणे. महिलांचा विनयभंग करणे. धमकी आणि शांतता भंग, जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे दांडी परिसरात तणावाचे वातावरण असून मालवण पोलिस अधिक तपास करत आहेत.