

Malvan Theft Arrest
मालवण : मालवण येथील घरफोडीच्या गुन्ह्यात तीन वर्षे फरारी असलेल्या सिद्धनाथ उर्फ सिद्धू हरिभाऊ पडलासकर (35, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) याला स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाच्या पथकाने पंढरपूर येथून ताब्यात घेतले. शनिवारी रात्री त्याला मालवण पोलिसांनी अटक केली आहे.
मालवण बाजारपेठ येथील तेजस नेवगी तर मालवण मेढा येथील महेश परब, ऋतुजा रवींद्र वारसे यांच्या बंद घरात घुसून दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्या प्रकरणी मालवण पोलिस स्थानकात सचिन माने, सिद्धू हरिभाऊ पडलासकर(रा पंढरपूर) व रवी संजय शेट्टी(रा. शिमोगा -कर्नाटक) या तिघांवर घरफोडीचा गुन्हा दाखल होता. दरम्यान हे तिघेही फरारी होते. त्यातील सि चन माने याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
तीन वर्षे फरारी असलेला सिद्धू पडलासकर याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेत मालवण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
ही घरफोडीची घटना 16 जून 2022 रोजी घडली होती. पोलिस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, अनिल हाडळ, पोलिस हवालदार आशिष गंगावणे, किरण देसाई, महिला पोलिस पूजा नांदोसकर यांनी तपासकामी मदत केली.