Sindhudurg ZP : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर 'महायुती'चा भगवा! अध्यक्षपदी प्रमोद कामत, तर दादा साईल उपाध्यक्ष

Sindhudurg ZP : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर 'महायुती'चा भगवा! अध्यक्षपदी प्रमोद कामत, तर दादा साईल उपाध्यक्ष
Published on
Updated on

ओरोस : गेल्या चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला नवे लोकनियुक्त पदाधिकारी मिळाले आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रमोद कामत आणि उपाध्यक्षपदी तुकाराम उर्फ दादा साईल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महायुतीच्या या विजयामुळे जिल्हा परिषद परिसर ढोल-ताशांच्या गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने दणाणून गेला होता.

विशेष बैठकीत निवडीवर शिक्कामोर्तब

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पीठासन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. सकाळी ११ ते १ या वेळेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीचेच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे दुपारी ३ वाजता अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सभागृहात चैतन्याचे वातावरण

भगवे फेटे परिधान केलेल्या सदस्यांच्या उपस्थितीमुळे जिल्हा परिषद सभागृह तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा एकदा गजबजलेले पाहायला मिळाले. प्रशासकीय राजवटीनंतर आता लोकनियुक्त सदस्यांच्या हाती कारभार आल्याने विकासकामांना गती मिळण्याची चिन्हे आहेत.

"जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध" - प्रमोद कामत

निवडीनंतर बोलताना प्रमोद कामत म्हणाले की, "खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे आणि महायुतीतील सर्व नेत्यांच्या सहकार्यामुळे ही संधी मिळाली आहे. १९९८ पासून सरपंच ते जिल्हा परिषद सभापती असा माझा अनुभव असून, सर्व ५० सदस्यांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास करणार आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनासह आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर दिला जाईल."

"जिल्ह्याला देशात अग्रस्थानी नेणार" - दादा साईल

उपाध्यक्ष दादा साईल यांनी सांगितले की, "१५ वर्षे सरपंच म्हणून काम केल्याचा प्रशासकीय अनुभव पाठीशी आहे. खासदार नारायण राणे आणि उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्रशासनाशी समन्वय साधून काम करू. पर्यटन आणि स्वच्छतेच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्याला केवळ राज्यातच नव्हे, तर देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा आमचा प्रयत्न राहील."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news