

कणकवली : कृषी विभागाने राज्यातील शेतकर्यांसाठी ‘महाविस्तार-एआय’ ((MahaVISTAAR-AI)) हे अत्याधुनिक मोबाईल अॅप लाँच केले आहे. शेतीत आर्टिफिशियल इंटेलिजस्य ( एआय) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकर्यांचे जीवनमान अधिक सुलभ आणि शेती अधिक फायदेशीर करण्याच्या उद्देशाने हे अॅप तयार करण्यात आले आहे. हे अॅप शेतकर्यांसाठी डिजिटल क्रांती असून या तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत-जास्त शेतकर्यांनी करावा, असे आवाहन कणकवली उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील यांनी केले आहे.
कृषी विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानात प्रगती केली आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जात असून शेतकर्यांच्या उन्नतीसाठी हे अॅप तयार केले आहे. असे उमाकांत पाटील यांनी सांगितले. ‘महाविस्तार-एआय’ अॅप शेतकर्यांसाठी एका डिजिटल हे अॅप सहाय्यकाप्रमाणे काम करते. ते शेतकर्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध करून देते.
प्रामुख्याने पेरणीच्या पद्धती, खतांचा वापर कसा करावा, पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षणाबद्दल वेळेवर, अचूक माहिती मिळणार आहे. शेतीसाठी आवश्यक रिअल-टाईम हवामान अंदाज, कृषी हवामान सल्ला, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमालाचे ताजे बाजारभाव, पिकांवरील कीड, रोगांची माहिती व त्यांच्या नियंत्रणासाठीचे सोपे उपाय, कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, अॅपद्वारे इतर शेतकर्यांशी आणि कृषितज्ज्ञांशी जोडले जाण्याची सोय होणार असून यातून शेतकरी समूदाय निर्माण होणार आहे. शेतकर्याला त्याच्या सोयीनुसार मराठीसह अनेक भाषांमध्ये माहिती उपलब्ध होणार आहे, अशी या अॅपची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे उमाकांत पाटील यांनी सांगितले.
शेतकर्यांना अनेकदा माहितीसाठी विविध ठिकाणी जावे लागते किंवा चुकीच्या माहितीमुळे नुकसान होते. या अॅपमुळे शेतकर्यांना विश्वासार्ह, वैयक्तिकृत आणि वेळेवर सल्ला मिळणार आहे. अॅपमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेतकर्याने बोलून किंवा लिहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याच्या स्थानिक भाषेत त्वरित मिळणार आहेत. या अॅपमुळे शेतीतील उत्पादकता वाढण्यास, खर्च कमी होण्यास, योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. शेतकर्यांनी त्वरित गुगल प्ले स्टोअरवरून (Google Play Store) हे अॅप मोफत डाऊनलोड करून त्याचा वापर सुरू करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत पाटील यांनी केले आहे.
तंत्रज्ञान आणि डेटा आधारित शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाविस्तार-एआय’ हे त्या दिशेने महाराष्ट्र शासन कृषी विभागाने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. तंत्रज्ञानाचा स्वीकार करूया आणि आपल्या शेतीला आधुनिक बनवूया. अधिक माहिती आणि मदतीसाठी शेतकर्यांनी आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन उमाकांत पाटील यांनी केले.