

सूरज कोयंडे
देवगड ः हर हर महादेवाच्या जयघोषात, ओम नम: शिवाय च्या नामजपात व श्री देव कुणकेश्वरचा नामघोषात श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवभक्तांचा जणू महासागर उसळल्याचे चित्र होते. पहिल्याच दिवशी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. मंगळवारी दर्श अमावास्येची पर्वणी असून यादिवशी पवित्र तीर्थस्नानाने या यात्रेची सांगता होणार आहे.
श्रीदेव कुणकेश्वरची शासकीय पूजा आ. दीपक केसरकर व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर दर्शनाला सुरूवात झाली.उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताअधिकारी जगदीश कातकर, देवगड तहसीलदार आर.जे.पवार यांनी पहाटे दर्शन घेतले. पहाटेपासून श्री कुणकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती. दिवसभरात अनेक मान्यवर मंडळी तसेच राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी दर्शन घेतले. यामध्ये पालकमंत्री नीतेश राणे, आ. कालीदास कोळंबकर, अलिबागचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.डी.सावंत, माजी आ. वैभव नाईक, माजी आ. ॲड.अजित गोगटे, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना नेते संजय आंग्रे, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, दानशूर व्यक्तिमत्व व आंबा बागायतदार विनायकशेठ पारकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम आदींनी दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्यावतीने लोकप्रतिनिधी, महनीय व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. देवस्थान टस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, सरपंच महेश ताम्हणकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व कुणकेश्वर ग्रामस्थ यांच्यावतीने या सर्वांचा सत्कार करण्यात आला. या महाशिवरात्रोत्सव निमित्त रस्त्याचा दुतर्फा राजकीय नेतेमंडळीचे बॅनर्स झळकत होते.