

सावंतवाडी : जिल्ह्यातील वीज समस्या गंभीर असून, महावितरणचे अधिकारी पालकमंत्री आणि शासनाची दिशाभूल करत आहेत, असा आरोप व्यापारी महासंघ आणि वीज ग्राहक संघटनेने केला आहे. अधिकार्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून जिल्ह्यातील सर्व ग्राहकांचे एका महिन्याचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
सावंतवाडी येथे आयोजित या पत्रकार परिषदेला वीज ग्राहक संघटनेचे सचिव दीपक पटेकर, बाळासाहेब बोर्डेकर, सुभाष दळवी, भूषण सावंत, तुकाराम म्हापसेकर, संतोष तावडे, श्रीकृष्ण तेली, संजय गावडे, जयराम वायंगणकर यांच्यासह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके म्हणाले, 20 मे पासून जिल्ह्यातील वीज सेवा कोलमडली आहे.
महावितरणचे अधिकारी खरी वस्तुस्थिती लपवून ठेवत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार केवळ 16 हजार ग्राहक विजे विना आहेत, परंतु प्रत्यक्षात हा आकडा खूप मोठा आहे. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे लाखो ग्राहक अंधारात आहेत. देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी, पहिल्याच पावसात परिस्थिती जैसे थे आहे. केवळ झाड पडणे किंवा फांदी कोसळणे यांसारखी क्षुल्लक कारणे देऊन अधिकारी वेळ मारून नेत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
या गंभीर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे, पुढील तीन महिन्यांत काय होईल, याची कल्पनाही करवत नाही. महावितरणकडे पुरेसा कर्मचारी वर्ग आणि साधनसामग्री नसल्यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे पर्यटन जिल्हा असूनही सिंधुदुर्ग अंधारात आहे, असे मत श्री.वाळके यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत मान्सूनपूर्व तयारीच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे लाखो ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.महावितरणची यंत्रणा पूर्णपणे कमकुवत झाली असून, आगामी काळात वीज ग्राहकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.
अॅड. नंदन वेंगुर्लेकर, समन्वयक- वीज ग्राहक संघटना
कणकवली आणि कुडाळ विभागातील वीज समस्यांना कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि कामचुकार सेक्शन ऑफिसर जबाबदार आहेत. वेंगुर्ला येथील एका अधिकार्याचे निलंबन म्हणजे केवळ दिखावा आहे.
संजय लाड, जिल्हाध्यक्ष-वीज ग्राहक संघटना