

कणकवली : राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील 288 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्य पदासाठी आणि थेट नगराध्यक्ष पदांची निवडणूक जाहीर केली. सिंधुदुर्गातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले या तीन नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. त्यामुळे महिनाभर आरोप-प्रत्यारोपांसह प्रचाराचा धुरळा उडणार असून, येथील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
सन 2022 मध्ये वरील चारही नगरपरिषदा आणि नगरपंचायतीची मुदत संपली होती. त्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट होती. अखेर तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणूकांचे बिगूल वाजले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता सतर्क झाले आहेत.
सिंधुदुर्गचा विचार करता मागील पाच वर्षातील निवडणूक आणि आता होणार्या निवडणूकातील राजकीय समीकरणामध्ये मोठे बदल झाले आहेत. सध्या राज्यात भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती सत्तेत आहे तर ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी विरोधात आहे. त्यामुळे या निवडणुका महायुती विरूध्द महाविकास आघाडी होतात की प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूका लढवितात, याची उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय त्या-त्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रातील त्या त्या पक्षातील राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार अलर्ट झाले आहेत. पुढील काही दिवसात निवडणुका युती, आघाडी किंवा स्वबळावर लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर उमेदवारांचीही घोषणा केली जाईल.
पुढील महिनाभरात या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. 26 नोव्हेंबरला उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर जेमतेम सहा दिवस राजकीय पक्षांना प्रचाराला मिळणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात अनेक राजकीय घडामोडी जिल्ह्यात घडतील अशी शक्यता आहे.