Sindhudurg News| महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून अभिनव समाज घडवण्याचं काम : संदेश पारकर

कणकवली येथे गटस्तरीय लोकनृत्य स्पर्धा बक्षीस वितरण
Sindhudurg News
Published on: 
Updated on: 

कणकवली : आपण कामगार कल्याण विभागाचे काम गेली अनेक वर्षे जवळून पाहत आहे. सदृढ व प्रतिभावंत कामगार व नागरिक घडवताना हे केंद्र त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंच उपलब्ध करतो. यातूनच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अभिनव व उपक्रमशील समाज घडवेल, असा विश्वास कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण अंतर्गत कणकवली केंद्र आयोजित गटस्तरीय लोकनृत्य स्पर्धा कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल हॉलमध्ये झाली. स्‍पर्धेचे उद्‌घाटन कोकणरत्न व कलारत्न पुरस्कार विजेते अंकुश गरूड यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ संघांनी ढोलनाच, चपई, लोकधारा, धनगरी लोकधारा नृत्यांचे सादरीकरण करत रसिकांची दाद मिळवली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यक्रमांचे अध्यक्ष विजय चव्हाण म्हणाले, एक अधिकारी, लेखक अभिनेता व ज्येेष्ठ रंगकर्मी यांनी कला जोपासताना अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मला मंडळाने दिली. या प्रवाहात सामील होण्याचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. हरीभाऊ भिसे, श्रीधर पाचंगे व गौरी दळवी यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत चिपळूणचे प्रभारी कामगार कल्याण अधिकारी राजेंद्र निकम यांनी, तर निवेदन केंद्र संचालक संतोष नेवरेकर यांनी केले. एलआयसी शाखा प्रबंधक सुहास गव्हाणकर, महावितरण उपव्यवस्थापक चुडाजी मोर्ये, कणकवली कॉलेज प्राचार्य युवराज महालिंगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन दीपक गायकवाड, नम्रता आराबेकर, सुष्मिता नाईक, स्नेहा चव्हाण, अमोल तळावडेकर, नंदिनी मांजरेकर, सविता देऊळकर, श्वेता नाईक यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.