

सिंधुदुर्गनगरी : आता कुठे उन्हाळी सुट्टी एन्जॉय करून मुंबईकडे परतलेला चाकरमानी पुन्हा गणेशोत्सवाला गावी येण्याचे नियोजन करत असला तरीदेखील जुलै महिन्यामध्ये ऐन पावसाळ्यात चाकरमान्यांना अचानक गावी यावे लागणार आहे. कारण गावच्मा यतदारयादीत असलेले नाव कायम ठेवायचे असेल तर चाकरमान्यांना गावाकडे एक ट्रीप मारावीच लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
तब्बल २४ वर्षांनंतर म्हणजेच २००२ नंतर पहिल्यांदाच मतदार यादी संपूर्णपणे स्वच्छ आणि अचूक करण्यासाठी हा विशेष मोहीम टप्पा हाती घेण्यात आला असून, जिल्ह्यात ३० जून ते २९ जुलैपर्यंत बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. सिंधुदुर्गनगरी येथे गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे बोलत होत्या. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश एकही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये आणि मृत, स्थलांतरित किंवा दुबार नावे मतदार यादीतून वगळून यादी पूर्णपणे 'क्लीन' करणे हा आहे. २००२ च्या मतदार यादीच्या तुलनेत सध्याचे मतदार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मॅपिंग करण्याचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत ९२.४२ टक्के मतदारांचे मॅपिंग निवडणूक आयोगाच्या ॲपवर यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
मजबूत प्रशासकीय यंत्रणा आणि ९२१ 'बीएलओ' तैनात
पुढील तीन महिने चालणाऱ्या या प्रक्रियेसाठी जिल्ह्यात व्यापक प्रशासकीय यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघांसाठी ३ मतदार नोंदणी अधिकारी (उपविभागीय अधिकारी) आणि तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांसह एकूण ४० सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त केले आहेत. जिल्ह्यातील एकूण ९२१ बूथांवर ९२१ 'बीएलओ' कार्यरत असून, त्यांच्यावर देखरेखीसाठी ९३ सुपरवायझर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएलओंच्या सोबतीला अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील आणि स्थानिक स्वयंसेवकांची मदत घेतली जात आहे. जिल्हा व तालुका स्तरावर मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
३० जून ते २९ जुलै दरम्यान बीएलओ येणार आपल्या दारी
या मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. या काळात सर्व बीएलओ निवडणूक आयोगाने दिलेले 'प्रि-प्रिंटेड' इन्यूमरेशन फॉर्म्स घेऊन प्रत्यक्ष प्रत्येक नागरिकाच्या घरी भेट देतील. कुटुंबातील मतदारांची माहिती तपासून फॉर्मवर त्यांची स्वाक्षरी घेतली जाईल. या फॉर्मची एक प्रत मतदाराला दिली जाईल, तर दुसरी प्रत बीएलओंद्वारे आयोगाच्या पोर्टलवर अपलोड केली जाईल.या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हा स्तरावर सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली आहे. राजकीय पक्षांनीही या मोहिमेत सहकार्य करत जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर आपल्या १,३०० बूथ लेव्हल एजंट्सची नियुक्ती केली आहे.
पावसाळ्याचे आव्हान, पण नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी
हा संपूर्ण कार्यक्रम मुख्य पावसाळ्याच्या दिवसांत येत असल्याने प्रशासनासमोर थोडे आव्हान नक्कीच आहे, परंतु स्थानिक पातळीवर त्याचे चोख नियोजन करण्यात आले आहे. हा राष्ट्रीय कार्यक्रम अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविला जात असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या बीएलओना अचूक माहिती देऊन आणि फॉर्मवर स्वाक्षरी करून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.