Human-Wildlife Conflict | अधिकार्‍यांना रजा, शेतकर्‍यांना सजा!

हत्तीचा उपद्रव कायम : मडुरा पंचक्रोशीतील शेतकर्‍यांचे उपोषण तात्पुरते स्थगित
Human-Wildlife Conflict
रकास : शेतकर्‍यांना आंदोलन स्थगित करण्याचे निवेदन सादर करताना वनाधिकारी.(Pudhari Photo)
Published on
Updated on

मडुरा : मडुरा, कास, सातोसे परिसरातील शेतकर्‍यांचा संयम अखेर तुटला आहे. गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून ‘ओंकार’ हत्ती या भागात दहशत माजवत आहे. शेतकर्‍यांची उभी पिके उद्ध्वस्त झाली, भात कापणी थांबली आणि मिरची पिकाची पेरणीसुद्धा ठप्प झाली. तरीही वन विभाग मात्र ‘अधिकारी रजेवर आहेत’ असे सांगत हात झटकत आहे. मात्र त्याची सजा शेतकर्‍यांना भोगावी लागत आहे. अस संताप मडुरा पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी व्यक्त केला. यावर वनाधिकार्‍यांनी 31 डिसेंबरपर्यंत ‘ओंकार’ हत्तीला पकडण्याची ग्वाही दिल्यानंतर शेतकर्‍यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

वन विभागाचे अधिकारी पृथ्वीराज प्रताप यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या वरिष्ठांकडे मेलद्वारे पाठवण्याचे आश्वासन दिले. मात्र शेतकरी म्हणाले, हत्तीचा उपद्रव थांबवणार कोण? आमच्या नुकसानीची भरपाई देणार कोण? हे अजूनही अनुत्तरितच आहे. आंदोलन थांबवण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत हत्तीला पकडणार आहोत असे सांगितले असले तरी शेतकर्‍यांचा विश्वास आता डळमळीत झाला आहे.

रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे म्हणाले, हत्तीच्या भीतीने शेतात कोणी मजूर कामाला येत नाहीत. उभे पीक शेतातच गळत आहे. काही गावांमध्ये भात कापणी 50 टक्क्यांहून अधिक झाली असताना मडुरा, सातोसे, कास भागात शेतकरी शेतात उतरण्याचीही हिंमत करत नाहीत. रब्बी हंगाम सुरू होण्याआधी मिरची पेरणीचे काम व्हायला हवे होते, मात्र हत्तीच्या दहशतीने तेही थांबले आहे.

Human-Wildlife Conflict
Sindhudurg news : ऐन दिवाळीत देवगड-जामसंडे शहरात पाणीटंचाई!

मडुरा माजी उपसरपंच विजय वालावलकर यांनी सांगितले, हत्तीला रोखण्यासाठी जो निधी वापरला जातो, त्याचा उपयोग करून या भागातच हत्तीला अन्न द्या. निदान आमच्या पिकांचे नुकसान तरी थांबेल. सातोसे माजी सरपंच आबा धुरी यांनी सवाल केला की, वन विभाग भात कापणीवेळी शेतकर्‍यांना संरक्षण देईल म्हणतो, पण हत्ती आला तर मजुरांना द्यावी लागणार्‍या मजुरीची जबाबदारी कोण घेणार?

कास सरपंच प्रवीण पंडित, मडुरा सरपंच उदय चिंदरकर, सातोसे माजी सरपंच आबा धुरी, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, कास तंटामुक्ती अध्यक्ष बाबू पंडित, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर नाटेकर, मडुरा उपसरपंच बाळू गावडे, माजी उपसरपंच विजय वालावलकर, पोलिसपाटील नितीन नाईक, सातोसे ग्रा.पं. सदस्य बाबू पंडित, उल्हास परब, मंदार वालावलकर, नकुल परब, प्रकाश सातार्डेकर, प्रकाश वालावलकर, अरुण परब, आनंद पुनाळेकर, नारायण पंडित, पांडुरंग पंडित, समीर किनळेकर, गुणो किनळेकर, समीर पंडित, शामू पंडित, गोपाळ पंडित, शशिकांत पंडित, रुपेश राणे, प्रसाद राणे, शांताराम राणे, ताता अमरे, भाऊ भगत, प्रसाद मांजरेकर आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा

शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून वन विभागाने ‘ओंकार’ला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले असले, तरी शेतकरी समाधानी नाहीत. दिवाळीच्या नावाखाली अधिकारी रजेवर आणि आम्हाला रोजची सजा, असा संतप्त भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली. जर हत्तीला लवकर पकडले नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला.

वन्यप्राण्यांकडून होणार्‍या शेती नुकसानीपोटी शासना कडून मिळणारी नुकसानभरपाई हास्यास्पद आहे. शासन प्रति गुंठा केवळ 594 रुपये देते; पण आम्ही एका गुंठ्यातून 3000 रुपयांचे उत्पादन घेतो. शेतकर्‍यांच्या वास्तवाशी शासनाचे निकष अजिबात जुळत नसून ही शेतकर्‍याची थट्टा आहे.

प्रवीण पंडित, सरपंच, कास ग्रा. पं.

अधिकारी रजेवर असले तरी शेतकर्‍यांचा राग आता पेट घेतोय. शासनाने हत्तीचा बंदोबस्त न केल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र होईल.

सुरेश गावडे, माजी सरपंच-रोणापाल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news