

सावंतवाडी :आदमापूर येथील बाळूमामाचे दर्शन आटोपून परत सावंतवाडी - तळवडेच्या दिशेने येणार्या इर्टिगा कारच्या चालकाने झोपेत माडखोल बस थांब्यावर उभ्या दोन दुचाकींना धडक दिली.
या अघातात एक महिला किरकोळ जखमी झाली. हा अपघात तडजोडीने मिटविण्यात आला. रविवारी सकाळी 8.30 वा. माडखोल बस थांबा येथे हा अपघात झाला . बाळूमामा येथील दर्शन आटोपून भाविक कारने माडखोलमार्गे सावंतवाडीकडे परतत होते. दरम्यान कार चालकाला डुलकी आल्याने कार रस्त्यालगत उभ्या दोन दुचाकींना धडकली.
यात माडखोल बस थांब्यावर बसची वाट पाहत थांबलेल्या एका महिलेच्या पायाला दुखापत झाली. तिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात सातुळी - बावळाट येथील रहिवासी भास्कर परब आणि माडखोल येथील लक्ष्मण गावडे यांच्या दुचाकींचे नुकसान झाले. सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्यानंतर कार चालकाने दोन्ही दुचाकींची भरपाई दिल्यानंतर हा अपघात तडजोडीने मिटविण्यात आला.