

मडुरा : मडुरा, रोणापाल आणि निगुडे गावांच्या गोठ्यांमध्ये लम्पी त्वचा रोगाने शिरकाव केल्याने पशुपालक शेतकर्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. विशेषतः नुकत्याच जन्मलेल्या वासरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असल्याने दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या या परिसरावर चिंतेचे ढग दाटले आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी, गुरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मडुरा परिसर हा दुग्ध उत्पादनासाठी ओळखला जातो. अनेक शेतकर्यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊन, शासनाच्या योजनेतून दुधाळ जनावरे खरेदी केली आहेत. त्यामुळे दूध व्यवसाय हा येथील शेतीला जोड देणारा प्रमुख आधारस्तंभ आहे. मात्र, आता याच पशुधनावर लम्पीचे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आतापर्यंत या तिन्ही गावांमध्ये एकूण 18 गुरांना लम्पीची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, यातील 15 जनावरे उपचारांती बरी झाली असून, 3 वासरांवर पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुपालकांनी गोठ्यात स्वच्छता राखणे, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
एकूण 18 गुरांना लम्पीची लागण
यातील 15 जनावरे उपचारांती बरी
3 वासरांवर उपचार सुरू
पशुपालकांनी घाबरून न जाता, रोगाची लक्षणे दिसताच तातडीने प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रोगाची प्रमुख लक्षणे: जनावरांना ताप येणे, अशक्तपणा आणि त्वचेवर
गाठी किंवा फोड येणे.
काय करावे?: वरील लक्षणे दिसल्यास गुरांना इतर जनावरांपासून वेगळे
ठेवावे आणि त्वरित मडुरा पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
प्रशासनाचा सल्ला : वेळीच निदान आणि उपचार मिळाल्यास जनावरे
पूर्णपणे बरी होत आहेत, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये.
लम्पी हा ’नीथलिंग व्हायरस’मुळे होणारा आजार आहे. योग्य उपचारांनी तो पूर्णपणे बरा होतो. आतापर्यंत लागण झालेली बहुतांश जनावरे बरी झाली आहेत. शेतकर्यांनी कोणतीही लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही मदतीसाठी तयार आहोत.
डॉ. एस. पी. फणसेकर, पशुवैद्यकीय अधिकारी, मडुरा