

सावंतवाडी ः नेमळे येथील शामसुंदर मालवणकर यांच्या डंपर वाहन कर्जप्रकरणी एका फायनान्स कंपनीने तब्बल 69 लाख रुपये रकमेवर आकारलेल्या परताव्याचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र लोकाधिकार समितीने या फायनान्स कंपनीच्या सावंतवाडीतील कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन छेडले. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून फायनान्स कंपनी व्यवस्थापनाने आंदोलकांशी चर्चा करत सकारात्मक कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.
सदर कर्ज प्रकरणी जून-2025 अखेरपर्यंत तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन कंपनी व्यवस्थापने लोकाधिकार समितीला दिले आहे. महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रसाद करंदीकर, कार्याध्यक्ष योगेश वाघमारे, जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नंदकुमार लोकरे, जिल्हा संघटक राजेश माने, जिल्हा उपसंघटक संजय पवार राजेश माने, जिल्हा सचिव डॉ. योगिता राणे, विवेक नाईक आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
सावंतवाडी शहरातील एका फायनान्स कंपनीने नेमळे येथील श्यामसुंदर मालवणकर या व्यक्तीला कंपनीने दुसर्या व्यक्तीकडून कर्ज थकीत प्रकरणी ताब्यात घेतलेला डंपर खरेदी करण्यासाठी 11 लाखांचे कर्ज दिले होते. त्यानंतर सदर डंपर मालवणकर यांच्या नावावर करण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील 25 हजार रुपये रक्कम त्यांनी कंपनीच्या गोव्यातील व्यवस्थापकाला दिली होती. मात्र तरीही डंपर नावावर न झाल्याने त्यांचे कर्ज थकीत झाले होते. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने आपल्या मर्जीतील ऑब्रिटेटर नेमून 11 लाख कर्ज रक्कमेवर तब्बल 69 लाख व्याज असा पठाणी भुर्दंड आकारला होता.
या अन्याया विरोधात श्री. मालवणकर यांनी महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडे व्यथा मांडली होती. त्यानंतर समितीने पाठपुरावा करूनही कार्यवाही न झाल्याने लोकाधिकार समितीने मंगळवार 11 फेब्रुवारी रोजी ‘त्या’ फायनान्स कंपनी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी सावंतवाडी शहरातील संबंधित फायनान्स कंपनीच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत संबंधित फायनान्स कंपनी कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला. त्यानंतर फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापनाने आंदोलकांची भेट घेत चर्चा केली. याबाबत निश्चितच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यानंतर अखेर कंपनी व्यवस्थापनाने शामसुंदर मालवणकर यांच्या कर्ज प्रकरणाबाबत आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयास कळवित आहोत, प्रस्तुत कर्ज प्रकरणी जून 2025 अखेरपर्यंत तोडगा काढण्याचा प्रयत्न राहिल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, अन्वर खान यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दिला.
दरम्यान दुसर्या एका प्रकारात याच फायनान्स कंपनीच्या मालवण शाखेच्या कर्जदाराचे अचानक वाहन आडवून दहा हजार रुपये उकळले. तेही वसुली अधिकार्यांने आपल्या बायकोच्या बँक खात्यावरील गुगल पे नंबरवर स्वीकारले असा धक्कादायक प्रकार अॅड. करंदीकर यांनी सबळ पुराव्यासह कंपनी अधिकार्यांच्या निदर्शनास आणली.