

देवगड : मालवण शहरातील अनेक गरजू नागरिकांना कर्जाचे आमिष दाखवून तब्बल ५१ लाख ६१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी शुभम कृष्णकांत देशमुख (रा. कळंबा, कोल्हापूर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचने फेटाळला आहे.
न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या एकलपीठासमोर झालेल्या सुनावणीत फिर्यादींच्या वतीने अॅड. कौस्तुभ मराठे, अॅड. प्राजक्ता शिंदे आणि अॅड. साक्षी जानकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
फेब्रुवारी २०२३ ते जानेवारी २०२५ या कालावधीत मालवणमधील भारती घारकर, सागर आढाव तसेच इतर अनेक नागरिकांना कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्यात आले. कोल्हापूरमधील १० जणांच्या गटाने ही फसवणूक केली असून, सिबिल तपासणीची आवश्यकता नसल्याचे सांगून कर्ज त्वरित मिळेल असे आमिष देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोणालाही कर्ज न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणात पीडित भारती घारकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात शुभम देशमुख व त्याचे साथीदार महमुना शेख, प्रियांका खबडे, राहुल खबडे, उमेश कांबळे, सुरेखा पाटील, आनंद माने, सचिन साबळे, सुरेश पाटील, महेश शिंदे व रेणुका बड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शुभम देशमुख याने अटकपूर्व जामीनासाठी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अर्ज दाखल केला होता. मात्र २८ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने हा अर्ज नामंजूर केला. कोल्हापूर जिल्ह्यातही अशाच फसवणुकीच्या तक्रारी समोर आल्याने मोठी आंतरजिल्हा टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे मालवण पोलिसांना आरोपींना अटक करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.