दोडामार्ग : दोडामार्ग सीमा तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी शनिवारी दुपारी १ वा. च्या सुमारास कारवाई केली. यावेळी २३ हजार ६०० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. अशा गैरप्रकारांवर आळा बसविण्यासाठी येथील नाक्यावर यापुढे आणखी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
दोडामार्ग तालुका हा महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांचा सीमेवर वसला आहे. दोडामार्गमधून तिन्ही राज्यांमध्ये अनेकांची दररोज वर्दळ सुरू असते. सध्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने आचारसंहिता सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दोडामार्ग, आयी, विजघर यांसह सहा सीमा तपासणी नाक्यांवर पोलिस, उत्पादन शुल्क व इतर विभागाचे कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी शुक्रवारी दोडामार्गमध्ये येत येथील परिस्थितीचा आढावा घेतला. कृषिकेश रावले यांनी शनिवारी दोडामार्ग चेकपोस्टला भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व वाहने थांबवून कसून तपासणी करण्याच्या सूचना पथकाला दिल्या.
दुपारी १ वा. च्या सुमारास गोव्यातून आलेल्या जीप व एका कारची तपासणी करताना दोन्ही वाहनांत गोवा बनावटीची बिगर परवाना दारू आढळून आली. त्यानंतर दोन्ही वाहने व संशयितांना पोलिस ठाण्यात आणले. यावेळी २३ हजार ६०० रुपयांचे मद्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.
निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांचा वापर होतो. हा पैसा हवाला मार्गे पोहोचविला जातो. शिवाय मोठ्या प्रमाणात गोवा राज्यातील बेकायदा मद्य तस्करीही होते. तपासणी नाके सुरू झाल्यामुळे अशा प्रकारांना आळा बसण्याची शक्यता असते. आचारसंहितेनंतर तालुक्यातील एकाही सीमा तपासणी नाक्यावर कारवाई करण्यात येथील पोलिसांना यश आले नाही. मात्र अतिरिक्त पोलिस अधीक्षक रावले यांनी दोडामार्ग सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी केली व अवैध दारू पकडली. या कारवाईमुळे दोडामार्ग पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.