

श्रावण : श्रावण बाजारपेठेत बिबट्याचा संचार होत असल्याचे उघड झाले आहे. बाजारपेठेतील कुबल सुपर मार्टच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात बिबट्याचा हा मुक्त संचार कैद झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनाधिकार्यांनी या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी श्रावण परिसरातून होत आहे.
शुक्रवार 5 सप्टें. रोजी पहाटे 5 वा. बिबट्या श्रावण बाजारपेठेत मुक्तपणे फिरत होता. येथील मनस्वी कुबल या त्याचवेळी आपल्या घराच्या गॅलरीत आल्या. त्यावेळी आचरा-कणकवली मार्गावर बिनधास्त फिरणारा हा बिबट्या त्यांच्या निर्दशनास आला. प्रथम दर्शनी कुबल यांना तो कुत्रा असल्याचा भास झाला. परंतु निरखूण पाहिल्यावर तो बिबट्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मनस्वी कुबल यांनी बिबट्याचा हा मुक्त वावर आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. तसेच सुपर मार्टच्या सीसीटीव्ही कॅमेर्यानेही या बिबट्याला कॅमेर्यात टिपले. श्रावण परिसरात गव्यांचा वावरही आहे. परिसरातील हिंस्र पशुंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.