Leopard Claws Seized | विक्रीसाठी आणलेली बिबट्याची बारा नखे, चार दात हस्तगत

वनविभागाकडून चौघांना अटक : फोंडाघाट-कणकवली मार्गावर डामरे येथे कारवाई
Leopard Claws Seized
विक्रीसाठी आणलेली बिबट्याची बारा नखे, चार दात हस्तगत (Pudhari File Photo)
Published on
Updated on

कणकवली : विक्रीच्या उद्देशाने आलेली बिबट्याची बारा नखे आणि चार दात वनविभागाच्या पथकाने तोतया ग्राहकाद्वारे सापळा रचून हस्तगत केली. याप्रकरणी फोंडाघाट येथील एका स्थानिकासह चौघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी 4 वा.च्या सुमारास फोंडाघाट-कणकवली मार्गावर डामरे गावच्या हद्दीत स्वामी समर्थ मठासमोर करण्यात आली.

याबाबत कणकवलीचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी त्यांना एका खबर्‍याकडून वन्य प्राण्याची नखे आणि दात विक्रीसाठी आणले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. संशयित ग्राहकाच्या शोधात होते. त्यामुळे वनविभागाने तोतया ग्राहक बनून सापळा रचला आणि संशयितांकडून ती खरेदी करण्याचा बनाव रचला.

त्यानुसार डामरे येथील स्वामी समर्थ मठासमोर रस्त्यावर संशयितांपैकी दोघेजण मंगळवारी सायंकाळी 3.30 वा. ते 4 वा.च्या सुमारास दुचाकीने येवून थांबले.अन्य दोघेजण नंतर आले. यावेळी त्या तोतया ग्राहकाकडे त्यांनी पैशांची मागणी केली. ग्राहकाने आधी वस्तू दाखव असे सांगितले असता त्यांनी त्यांच्याकडील वाघ नखे आणि दात काढून दाखवले. त्याक्षणी वनविभागाने सापळा रचल्यानुसार वनक्षेत्रपाल सुहास पाटील व कर्मचारी त्याठिकाणी हजर झाले आणि चौघांनाही मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.

या गुन्ह्यात संशयित विजय महादेव हळदिवे (रा. फोंडाघाट), कृष्णात भिकाजी रेपे(रा.अकनूर, ता. राधानगरी), तौफिक अल्लाउद्दीन सनदी (रा.गळतगा, ता.चिकोडी, बेळगाव) आणि परशुराम प्रकाश बोधले (रा.नवलीहळ, ता.चिकोडी, बेळगाव) यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

Leopard Claws Seized
Kankavali News | कणकवली-कनेडी मार्गालगत सुकलेली झाडे धोकादायक

सदर कारवाई मुख्य वनसंरक्षक जी.गुरुप्रसाद, जिल्हा उपवनसंरक्षक मिलीश शर्मा व सहा. वनसंरक्षक एस.के.लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील, फोंडाघाट वनपाल धुळू कोळेकर, देवगड वनपाल श्रीकृष्ण परीट, दिगवळे वनपाल सर्जेराव पाटील, वनरक्षक सुखदेव गळवे, प्रतिराज शिंदे, सिध्दार्थ शिंदे, रामदास घुगे, नितेंद्र पोर्लेकर, रोहित सोनगेकर, अंकुश माने, स्वाती व्हनवाडे, रिध्देश तेली, सागर ठाकूर, चालक तसेच मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी ही कारवाई केली.

Leopard Claws Seized
Kankavali News | कणकवली-कनेडी मार्गालगत सुकलेली झाडे धोकादायक

चारही संशयितांना बुधवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार आहे. आरोपींनी वाघ नखे आणि दात कोठून मिळवले?, त्या वन्य प्राण्याची शिकार कधी झाली होती?, यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत का?, याबाबतचा तपास वनविभाग करणार आहे. जप्त केलेली वाघ नखे आणि दात तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवली जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news