

कुडाळ : कुडाळ शहरात वन्यजीवांच्या अवयवांच्या तस्करीचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. बिबट्याच्या नखांचा सौदा होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अचानक धडक देत संयुक्त छापा टाकला. या कारवाईत बिबट्याची नखे आणि वन्यजीवांच्या अवयवांशी संबंधित लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच कुडाळ बाजारपेठेत वन्यजीवांच्या अवयवांच्या तस्करीचे मोठे प्रकरण उघड झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ परिसरात बिबट्याच्या नखांची तस्करी होणार असल्याची गोपनीय खबर वनविभागाला मिळाली होती. या माहितीची दखल घेत वनविभागाच्या पथकाने कुडाळ पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत बिबट्याची नखे आणि वन्यजीवांच्या अवयवांशी संबंधित लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्तकरण्यात आला असून, सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.
या कारवाईबाबत वनाधिकारी व पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. नेमका किती मुद्देमाल जप्त झाला? या तस्करीत कोणाचा सहभाग आहे? बिबट्याची नखे कुठून आणली जात होती आणि त्यांचा सौदा कोणाशी होणार होता? या प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईला दुजोरा दिला असला तरी तपास सुरू असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास नकार दिला.
शहरात वन्यजीव अवयव तस्करीचे दुसऱ्यांदा प्रकरण!
कुडाळ शहरात काही महिन्यांपूर्वीच वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी आणि बेकायदेशीर विक्री करणाऱ्या रॅकेटचा वन विभागाने पर्दाफाश केला होता. बाजारपेठेतील एका प्रसिद्ध दुकानावर छापा टाकून बिबट्याची नखे, दात आणि वन्यजीवांचे अन्य अवयव असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यापूर्वी खवले मांजराच्या खवल्यांच्या तस्करीप्रकरणीही कारवाई झाली होती. आता पुन्हा बिबट्याच्या नखांची तस्करी समोर आल्याने हा केवळ एखाद्या व्यक्तीचा व्यवहार आहे की यामागे मोठे तस्करीचे जाळे कार्यरत आहे? असा प्रश्न आहे. वन्यजीवांच्या अवयवांचा काळाबाजार नेमका किती खोलवर रुजला आहे, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.