

सिंधुदुर्ग : सरकारने हळूहळू लाडक्या बहिणींच्या योजनेचे नियम आणि निकष लावण्यास सुरुवात केली असून त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्या महिलांची संख्या हळूहळू कमी होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 23 हजार लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये 4458 लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेण्यात अपात्र ठरल्या आहेत. या पडताळणीत 18 हजार 513 लाडक्या बहिणींना मात्र सरकारकडून पैसे मिळतच राहणार आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ही योजना सुरू झाली होती. सरसकट जे अर्ज येतील त्यांना लाभ देण्यात आला. आता या योजनेची सरकारने पडताळणीस सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 23 हजार महिलांची पडताळणी सुरू करण्यात आली. यामध्ये दोन प्रकारे पडताळणी करण्यात आली. पहिल्या प्रकारामध्ये वयाची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणार्या 65 पेक्षा जास्त वय असलेल्या 856 आणि 21 वर्षापेक्षा कमी वय असलेलया पाच महिला सापडल्या, अशा 877 महिलांना अपात्र ठरविले.
दुसर्या प्रकारात एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिलांना तपासण्यात आले. 3293 महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या कुटुंबाची तपासणी करताना 287 महिला सापडल्या नाहीत. अर्थात, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे.
राज्यभरात जेव्हा पडताळणी सुरू केली तेव्हा या पडताळणीला अंगणवाडी कर्मचार्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये विरोध दर्शविला. सिंधुदुर्गातही सुरुवातीला विरोध झाला; परंतु नंतर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी कामाला सुरुवात केली. मध्येच गणेशोत्सव आल्यामुळे काम थंडावले होते. मात्र त्यानंतर पुन्हा ते सुरू झाले. जवळपास 23 हजार महिलांची घरोघरी जाऊन तपासणी केली. ज्या 287 आणि 17 महिला घरी सापडल्या नाहीत त्या बहुतेक मुंबईला गेल्याचा अंदाज आहे. कारण अनेक मुंबईकर महिलांनी आपल्या गावच्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेतला आहे.