

सिंधुदुर्ग : ‘होळ देव रे होळ देव...’ची बोंब जशी थंडावली तशी कोकणातील होळी सणात गजबजलेल्या घरांची झडपे पटापट बंद होऊ लागली. कुणी मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघाला, तर कुणी कोल्हापूर, गोवा आणि पुण्याकडे... गावांत रोजगार, सुविधांचा अभाव असल्याने ही मंडळी शहरांकडे धाव घेऊ लागल्याचे चित्र प्रत्येक सणानंतर दिसते. कोकणातील गावे अशी ओस पडत चालली आहेत. बारा बलुतेदारी, गावर्हाटी, गावचा कारभार, गावची शांतता, गावचे प्रेम, आपुलकी, माणुसकी या सर्वांचा त्याग करून शहरात राहण्याकडे वाढलेला कल, यामुळे एकेकाळच्या कोकणातील समृद्ध ग्रामीण जीवनाला अवकळा आली आहे. एकीकडे गावे रिती होत असताना दुसरीकडे मात्र शहरे फुगू लागली आहेत.
कोकणात रोजगार तसा कधीच नव्हता. पारंपरिक पावसाळी शेती हेच उत्पन्नाचे साधन. आता आंबा, काजू बागायती आणि जोडीला पर्यटन व्यवसाय कोकणला आर्थिक समृद्धता देत आहे. असे असले, तरी गावखेड्यातले जीवन नव्या पिढीला नको आहे. गावात शहरांसारखा डोळे दीपवणारा झगमगाट नाही. सरकारी शाळांचे काही खरे नाही. आरोग्य सुविधांचा प्रश्न आहेच, रोजगार तर नाहीच. म्हणून मग पैसा आणि मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडलेला बरा, अशा विचारानेच ग्रामीण माणूस शहराची वाट धरतो आहे.
तालुक्याचे ठिकाण भले 15 ते 20 कि.मी. अंतरावर आहे, तरीदेखील ते शहर आहे म्हणून तिथे राहायला जायचे आहे, ही मानसिकता का? तर तिथे रेल्वेस्थानक जवळ आहे. बसस्थानक अगदी घराला खेटून आहे. मराठीच कशाला, इंग्लिश मीडियमच्या शाळाही तिथे आहेत. जवळच सुसज्ज हॉस्पिटल आहे, घरात कुणालाच बसायची गरज नाही; कारण घरातील प्रत्येकाला काही ना काही रोजगाराची संधीदेखील आहे. म्हणून शहरांकडे ओढा वाढला आहे.
गावात असतीलच तर साठी गाठलेले आई-वडील आणि इतर वृद्ध मंडळी. शेती करायचा प्रश्नच नाही. कारण, शेती केव्हाच सोडली गेली आहे. रेशन कार्डवर मिळणारे गहू, तांदूळ तसे पुरेसे आहेत. सण आला की, मात्र गाव भरते, घरे उघडतात. गणपती उत्सवाला घरे-दारे रंगतात. भजने, फुगड्या होतात. गणपती गावाला गेले की, पुन्हा घरांना कुलूप लावून परतीचा प्रवास सुरू होतो; मग गावच्या जत्रेचे वेध लागतात. दोन दिवस राहून पुन्हा शहराकडे परतल्यानंतर होळीच्या सणाला गावे गजबजतात. मे महिन्याची सुट्टी गावी घालवतात; पण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते म्हणून तेव्हाही गावी येण्याची टाळाटाळ होतेच.
कोकण आणि मुंबईचे नाते तसे घट्ट. त्या शहरातल्या धावपळीच्या जीवनाची सवयच जणू झालीय. त्यात पुन्हा गावात राहणारा, शिकलेला, कमवता मुलगा गावच्या मुलीला पसंत नसतो. तिला मुंबईचाच नवरा हवा. म्हणून मग एकुलत्या मुलासाठी मुंबईत खोली घेणे, नोकरी शोधणे यासाठी बापाची धडपड सुरू होते. कशी तरी मुंबई गाठतो तेव्हा कुठे मुलगा बोहल्यावर चढतो. तरुण पिढी आणि विशेषत: मुलींमध्ये वाढलेले मुंबई आणि शहरांचे आकर्षण गावे ओस पडण्यामागे कारणीभूत ठरत आहे.