Kunkeshwar Temple | कुणकेश्वरात सापडले ११ व्या शतकातील प्राचीन मंदिराचे अवशेष

प्राच्य विद्याअभ्यासक रणजित हिर्लेकर यांची माहिती
Kunkeshwar Temple
कुणकेश्वर : मंदिर परिसरात सुरू असलेले खोदाईचे काम. (छाया : वैभव केळकर)Pudhari
Published on
Updated on

देवगड : कुणकेश्वर मंदिर परिसरात पुन्हा एकदा अकराव्या शतकातील प्राचीन मंदिराचे अवशेष सापडत आहेत. मंदिर परिसरात दर्शनासाठीच्या उड्डाणपुलाचे बांधकाम सध्या सुरू असून, याच्या पिलरच्या खोदाईचे काम सुरू असताना हे अवशेष सापडले असल्याची माहिती प्राच्य विद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर यांनी दिली.

आतापर्यंत सापडलेले अवशेष हे कुणकेश्वर मंदिर परिसराच्या बाहेर समुद्राकडील दक्षिण बाजूला सापडले आहेत. पण आता मंदिराचे हे अवशेष मंदिर परिसरात मंदिराच्या उत्तर बाजूला तटबंदीलगत आढळून आले आहेत. यात्रेवेळी भक्तनिवासातील दर्शन मंडपातून कुणकेश्वर मंदिराकडे येणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या पुलाच्या पायासाठी दहा पंधरा फूट खोल खड्डे खोदाईचे काम सध्या सुरू आहे. खड्ड्यामध्ये दहा फुटाच्या खाली हा प्राचीन अवशेष आढळून आला आहे. तसेच कुणकेश्वर मंदिरालगत असणाऱ्या भैरव मंदिराचे जिर्णोद्धाराचे जे काम नुकतेच सुरू झाले आहे. या मंदिराच्या मंडपाचा भाग काढून टाकून तेथे नवीन बांधकाम करण्यासाठी चर खणण्याचे काम सुरू असताना या मंडपाच्या चौथऱ्यात काही जुने कोरीव काळ्या पाषाणाचे अवशेष आढळून आले आहेत.

Summary

समुद्र किनाऱ्यावरील मंदिराचे हे अवशेष एवढ्या वर्षांनी वर येण्याचे कारण वाळूची सतत होणारी धूप व सोबत सुरू असलेले खोदकाम हे मुख्य कारण आहे. यापुढे देखील जसजशी धूप होत जाईल, तसतशी आणखीनही या मंदिराचे प्राचीन अवशेष सापडण्याची शक्यता आहे

या अवशेषांविषयी माहिती देताना रणजीत हिर्लेकर म्हणाले, २०११ साली असेच प्राचीन अवशेष सापडले होते. त्यावेळी कोकण इतिहास परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी यांनी इतिहास संशोधकांच्या टिमसह कुणकेश्वर येथे पाहणी के ली होती. ते अवशेष आठव्या, नवव्या शतकातील असावेत. प्राचीन काळी येथे मोठ्या प्रमाणात संपन्न व प्रगत लोकवस्ती असल्याचे स्पष्ट होत आहे. या मंदिराच्या जागी पूर्वी येथे एक प्राचीन मंदिर असले पाहिजे असे या कोरीव अवशेषांवरून दिसून येते. त्याकाळी सुलतानी आक्रमणे मोठ्या प्रमाणात होत असत. मूर्तीमधील देवत्वाचे रहस्य त्यांना समजत नसल्याने ते या मूर्ती फोडून टाकीत असत.

डॉ. दाऊद दळवी यांनी२०११ साली जी शक्यता व्यक्त केली त्याची प्रचिती वारंवार येत आहे. ११ व्या शतकात कुणकेश्वरचे प्राचीन मंदिर अस्तित्वात होते. ते संपूर्ण काळा बेसाल्ट पाषाणात कोरीव कामाने संपन्न होते. त्याच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे त्यावर सातत्याने परकीयांकडून आक्रमणे झाली. रामदेवराय यादवांच्या राजवटीच्या पतनानंतर छत्रपती शिवरायांच्या उदयापर्यंत या मंदिराची आक्रमकांनी पार दुर्दशा केली. पुढे मराठा काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी जुन्या मंदिराचे अवशेष या सर्व परिसरात सापडत आहेत.

११ व्या शतकातील कुणकेश्वर मंदिर...

कुणकेश्वर मंदिर हे अकराव्या शतकातील कदंब, चालुक्य, शिलाहार यांच्या काळातील असून त्याची साक्ष देणारे हे मंदिराचे प्राचीन अवशेष भाविकांना पाहण्यासाठी जतन करून ठेवणे आवश्यक आहे. कुणकेश्वरातील हे सापडलेले अवशेष ११ व्या शतकातील असून ते २०११ सालीही सापडले होते. तेव्हापासून आम्ही सातत्याने या मंदिराच्या जुन्या अवेशषांचा शोध घेत आहोत. आतापर्यंत कुणकेश्वर मंदिराच्या समुद्राकडील बाजुस जेव्हा जेव्हा बांधकामाच्या निमित्ताने खोदकाम करण्यात आले त्या त्या वेळी अशा त-हेचे मंदिराचे अवशेष सातत्याने सापडत आहेत. यातूनच कुणकेश्वराच्या मंदिराचे ऐतिहासिक महत्व अधोरेखीत होत असून त्याची जपणूक करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.

रणजीत हिर्लेकर

नुकत्याच सापडलेला अवशेषांविषयी हिर्लेकर म्हणाले की, हे अवशेष मंदिराच्या अधिष्ठानाचे अथवा मंडोवराचे भाग आहेत. खुर, कुंभ, कर्णिका, अंतरपत्र यासारखे कोरीव कामाचे जे थरावर थर असतात त्यापैकी काही भागाचे हे अवशेष आहेत. या दोन खड्ड्यांमधील दगड मातीचा थर पाहता येथे कोणताही जांभा खडक आढळून येत नाही. त्यामुळे हा सर्व भाग भराव घालून भरून काढलेला आहे.

या खणलेल्या खड्ड्यामधे जुन्या तटबंदीच्या पायाचे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे आज आढळणाऱ्या तटबंदीच्या १०×१२ फूट आत पूर्वी मूळ मंदीराची तटबंदी असावी, पुढे जीर्णोद्धाराच्या वेळी मंदिर परिसराची जागा विस्तारण्यासाठी हा तट काढून बाहेर सरकवून नवीन तट बांधण्यात आला असावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news