Kunkeshwar Temple | कुणकेश्वर मंदिरात हजारो हापूस आंब्यांची भव्य आरास

यंदाचा देवगड हापूस आरास सोहळा उत्‍साहात संपन्न : सोमनाथ मंदिराच्या लाईव्ह दर्शनाने भक्तिमय वातावरण
 कुणकेश्वर मंदिरात हजारो हापूस आंब्यांची भव्य आरास
कुणकेश्वर मंदिरात हजारो हापूस आंब्यांची भव्य आरास
Published on
Updated on

देवगड : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे यंदाचा देवगड हापूस आरास सोहळा, आंबा महोत्सव आणि सोमनाथ मंदिराच्या थेट दर्शनामुळे भक्ती, श्रद्धा आणि पर्यटनाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. सोमवारचा पवित्र दिवस, हजारो हापूस आंब्यांची आकर्षक आरास, नवसपूर्तीचा भावनिक प्रसंग आणि गुजरातमधील सोमनाथ मंदिराचे लाईव्ह दर्शन यामुळे कुणकेश्वर नगरी दिवसभर भक्तिमय वातावरणाने भारावून गेली होती.

२०१७ साली देवस्थान ट्रस्टचे तत्कालीन सदस्य शैलेश बोंडाळे यांनी ११ मे रोजी श्री देव कुणकेश्वर मंदिरात देवगड हापूसची आरास करण्याची संकल्पना मांडली होती. देवस्थान ट्रस्टने या उपक्रमाला मान्यता देत प्रत्यक्षात त्याची सुरुवात केली आणि आज या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदा विद्यमान देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांनी या उपक्रमाला आंबा महोत्सवाची जोड देत स्थानिक शेतकरी आणि उत्पादकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

कुणकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने त्यांच्यापर्यंत अस्सल देवगड हापूस पोहोचवावा आणि देवगड हापूसच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवावी, या उद्देशाने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यासाठी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दहा स्टॉल मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. या स्टॉलमध्ये पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आपल्या बागेतील हापूस आंबा तसेच आंब्यापासून बनविलेले विविध पदार्थ विक्रीस ठेवले होते.

आंबापोळी, आंबावडी, आंबा पल्प, आंबा शेक आणि इतर फळप्रक्रिया पदार्थांना पर्यटकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. आंबा शेकचा आस्वाद घेत पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. मंदिराच्या गाभाऱ्यात आणि सभामंडपात हजारो हापूस आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. संपूर्ण मंदिर परिसर हापूसच्या सुगंधाने दरवळून गेला होता. विशेष म्हणजे जपानमधील प्रसिद्ध “मियाझाकी” प्रजातीच्या आंब्याचाही या आरासमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यामुळे भाविक आणि पर्यटकांमध्ये या आरासबाबत विशेष आकर्षण निर्माण झाले होते.

दरम्यान, डोंबिवली येथील म्हात्रे कुटुंबीयांनी श्री देव कुणकेश्वर चरणी आपली नवसपूर्ती करत भक्तिभावाचा अनोखा अनुभव दिला. त्‍यांनी आज मंदिरात येऊन पेढे आणि पाच फळे देव चरणी अर्पण करत नवसाची पूर्तता केली.

याचवेळी गुजरातमधील प्रभास पाटण येथील श्री सोमनाथ मंदिरातील धार्मिक कार्यक्रम, पूजा आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण कुणकेश्वर मंदिर परिसरात मोठ्या एलईडी स्क्रीनवर दाखविण्यात आले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय आणि देवगड तहसील प्रशासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सोमनाथ मंदिराचे थेट दर्शन घेण्याची संधी मिळाल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह आणि समाधान व्यक्त करण्यात आले.

याच दरम्यान कुणकेश्वर मध्ये काल रात्री अचानक तेली यांच्या लाईट मीटर मध्ये लागलेल्या आगीमुळे एका कुटुंबावर ओढवलेल्या आपत्ती प्रसंगावर तात्काळ प्रसंगावधान राखत सरपंच महेश ताम्हणकर यांनी केलेल्या कार्याचे देवगड तहसीलदार रमेश पवार यांनी कौतुक करत त्यांच्या सत्कार केला. या कार्यक्रमावेळी देवगड तहसीलदार रमेश पवार, तहसील कार्यालयातील कर्मचारी, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली सरपंच महेश ताम्हणकर, तसेच असंख्य भाविक आणि पर्यटक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news