Sindhudurg Rain : आधी भातपीक करपले अन् आता अवकाळीने भिजवले!

कुडाळ तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस; भातशेतीला मोठा फटका
Sindhudurg Rain update
कुडाळ : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे अशाप्रकारे नुकसान होत आहे. (छाया : काशिराम गायकवाड)
Published on: 
Updated on: 

कुडाळ : कुडाळ तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी सायंकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह ग्रामीण भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. सध्या भातकापणीचा हंगाम जोरात सुरू असतानाच या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. कापणीसाठी तयार झालेले उभे भातपीक जमिनीवर आडवे पडण्याबरोबरच कापून वाळत घातलेले भातही भिजल्याने शेतीचे नुकसान होत आहे.

यंदा अल निनोच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची तूट जाणवली. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अपेक्षित परतीचा पाऊस न झाल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. कमी पाऊस आणि कडक उन्हामुळे भातशेतीवर आधीच प्रतिकूल परिणाम झाला असताना आता अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. ग्रामीण भागात सध्या भातकापणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

चालू आठवड्यात कुडाळ तालुक्यात तीन ते चार वेळा पावसाने हजेरी लावली. सोमवारी सायंकाळी पाऊस झाला, तर मंगळवारीही काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी विजांचा प्रचंड कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने तालुक्याला झोडपले. या वादळी पावसात काही ठिकाणी झाडे पडली, तर हिर्लोक पंचक्रोशीतील काही घरे आणि दुकानांच्या छपरांचे नुकसान झाले. तर पिंगुळी उत्कर्ष नगर परिसरात वीज पोल झाडावर कलंडला असून धोकादायक स्थितीत आहे.

शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट

सध्या भातकापणीचा हंगाम सुरू असल्याने अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कापणीसाठी तयार झालेले उभे भातपीक पावसामुळे जमिनीवर आडवे पडत आहे, तर कापणी करून शेतात वाळत घातलेले भात भिजून नुकसान होत आहे. आधीच कमी पाऊस आणि कडक उन्हामुळे भातशेतीचे नुकसान झाले असताना आता सलग पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news