Sindhudurg News| वीजपुरवठा, रस्ते आणि एसटी वाहतुकीचे नियोजन करा

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या सूचना!
Sindhudurg News
कुडाळ : गणेशोत्सव नियोजन तयारीचा आढावा घेताना सभापती मिलिंद नाईक. (छाया : काशिराम गायकवाड)
Published on: 
Updated on: 

कुडाळ : कोकणवासीयांचा महत्त्वाचा आणि मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव सुरळीत व सुरक्षित पार पडावा, यासाठी कुडाळ पंचायत समितीने प्रशासकीय यंत्रणांच्या नियोजनाला वेग दिला आहे. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांनी बुधवारी महावितरण, एसटी महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची बैठक घेत विभागनिहाय तयारीचा आढावा घेतला. गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरण, बांधकाम विभाग व एसटी प्रशासनाला दक्षतेचे निर्देश सभापती श्री.नाईक यांनी दिले.

पंचायत समितीतील सभापतींच्या दालनात ही आढावा बैठक झाली. सा. बां. चे सहा.कार्यकारी अभियंता धीरजकुमार पिसाळ, कुडाळ आगार व्यवस्थापक रोहित नाईक, वाहतूक नियंत्रक महादेव आंबेसकर, महावितरणचे श्री. निळकंठ आदी उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात गणेशभक्त तसेच चाकरमानी दाखल होतात. त्यामुळे वीजपुरवठा, रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सभापती मिलिंद नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्या विभागाची तयारी आणि नियोजन जाणून घेतले.

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना!

गणेशोत्सव हा तालुक्यातील मुख्य आणि मोठा उत्सव असल्याने या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची महावितरणने विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना सभापती नाईक यांनी दिल्या. वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार सेवा मिळण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

खड्डे बुजवून रस्ते वाहतुकीस सुरक्षित करा

गणेशोत्सव काळात गावागावांत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढते. त्यामुळे सार्व.बांधकाम विभागासह जि. प. बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत, असे निर्देश सभापती श्री.नाईक यांनी दिले. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली धोकादायक झाडी हटवून वाहतुकीस सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा. गणेशभक्त, नागरिक आणि वाहनचालकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

एसटी प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी!

गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे यांसह विविध ठिकाणांहून चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येतात. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या काळात तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे एसटी प्रशासनाने गावागावांत निर्धारित वेळेत बसेस सोडाव्यात. प्रवाशांची गर्दी वाढल्यास ज्यादा फेऱ्यांचे नियोजन करावे, अशा सूचना सभापती मिलिंद नाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या. गणेशभक्त व प्रवाशांना वेळेत आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी, बससेवेअभावी कोणाचीही गैरसोय होऊ नये, यासाठी आगाराने आवश्यक ते नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news