Sindhudurg Rain : मान्सूनपूर्व पावसामुळे कुडाळ आठवडा बाजारात नागरिकांची तारांबळ!

छत्री, रेनकोट खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
Sindhudurg Rain
मान्सूनपूर्व पावसामुळे कुडाळ आठवडा बाजारात नागरिकांची तारांबळ!
Published on: 
Updated on: 

कुडाळ : मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच जिल्ह्यात बुधवारी सकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. कुडाळ शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र अचानक आलेल्या या पावसाने आठवडा बाजारासाठी आलेले नागरिक आणि व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली. तर पावसाळ्यासाठी छत्री, रेनकोट तसेच अन्य साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी झाली होती.

बुधवार हा कुडाळचा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होती. स. १०.३० वा. पासून जवळपास दीड तास कोसळलेल्या पावसामुळे फिरते विक्रेते, ग्राहक आणि व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. अनेक विक्रेत्यांनी आपला माल सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ केली, तर ग्राहकांनीही पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणांचा आसरा घेतला. पादचारी नागरिक तसेच दुचाकीस्वारांनी रस्त्यालगतच्या दुकाने, प्रवाशी शेड आणि घरांचा आसरा घेतला. रस्ते ओले चिंब झाले होते. या पावसामुळे वातावरणातील उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असून, शेतकरी वर्गानेही समाधान व्यक्त केले आहे. ग्रामीण भागात भात पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. बाजारपेठेत छत्री, रेनकोट मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाले असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या वस्तूंच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मे महिन्याच्या अखेरीस ग्रामीण भागात भातशेतीची मशागत करण्यात आली आहे. काही ठिकाणी भात पेरणी करण्यात आली आहे. मात्र मान्सून दाखल होताच, सर्वत्र भातपेरणीसह शेतीच्या कामांना वेग येणार आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news