Sindhudurg News : कुडाळात ­१२ जुलैला मॅरेथॉनचा जल्लोष

ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्रॉप धावणार; ‘कुडाळ मॉन्सून रन - २०२६’ : दोन हजार धावपटूंच्या सहभागाची अपेक्षा
Sindhudurg News
कुडाळात ­१२ जुलैला मॅरेथॉनचा जल्लोष
Published on
Updated on

कुडाळ : शरीर आणि मन यांच्यातील संतुलन उत्तम राखण्यासाठी आज व्यस्त दिनक्रमात व्यायामाला अग्रक्रम देणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे आणि याच कल्पनेतून नागरिकांमध्ये चालणे, धावणे आणि निरोगी राहण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी यंदाही 'कुडाळ मॉन्सून रन’ चे आयोजन करण्यात आले आहे. राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असो., कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब यांच्या विद्यमाने १२ जुलै रोजी स. ५.३० वा. या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन कुडाळ येथे करण्यात आले आहे. सातत्यपूर्ण यशासह हा उपक्रम तिसऱ्या वर्षात वाटचाल करत आहे, अशी माहीती डाॅ. जी. टी. राणे यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली. =

केनिया देशाचा ‘इंटरनॅशनल वर्ल्ड मॅरेथॉन विनर व ऑलिम्पिक चॅम्पियन’ विल्सन किप्राॅप या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असून, त्यांची उपस्थिती या मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण असणार आहे, असे ते म्हणाले. येथील हाॅटेल स्पाइस कोकण येथे आयोजित पत्रकार परिषदेत डाॅ. जी. टी. राणे बोलत होते. डाॅ. प्रशांत सामंत, गजानन कांदळगावकर, डाॅ. जयसिंग रावराणे, रूपेश तेली, शिवप्रसाद राणे, साईराज जाधव, बंड्या सावंत व मकरंद नाईक आदी उपस्थित होते.

डाॅ. राणे म्हणाले, देशाची खरी संपत्ती म्हणजे इथली निरोगी जनता. याच विचाराने ३ वर्षांपूर्वी 'राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर'ने एका मॅरेथॉनची मुहूर्तमेढ रोवली गेली. समाज निरोगी आणि आनंदी असावा, यासाठी आमची संपूर्ण टीम अविरत प्रयत्नशील आहे. कारण, सुदृढ नागरिकच एका 'सशक्त राष्ट्राचा' भक्कम पाया असतात. मागील दोन वर्षातील मॅरेथॉन स्पर्धा शिस्तबद्धतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे. २०२४ मधील ७५० आणि २०२५ मधील १३५० धावपटूंचा वाढता प्रतिसाद, हे आपल्या यशाचे गमक आहे. याच शानदार यशाची दखल घेत 'मुंबई रोड रनर्स'ने आपल्या स्पर्धेला 'Best Rated Half Marathon of The Year २०२४' चा मानाचा पुरस्कार दिल्याचे त्यांनी सांगितले. आपली स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली असून, परदेशी स्पर्धकही यात सहभागी होत आहेत. दरवर्षी या मॅरेथॉनचा स्तर वाढत चालला आहे.

मॅरेथॉनची उंची वाढण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. भविष्यात ही मॅरेथॉन उत्तुंग शिखरापर्यंत पोचेल असा विश्वासही डाॅ.राणे यांनी व्यक्त केला. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सदस्यांना मेडल, डिजिटल सर्टिफिकेट व तसेच प्रत्येक गटामधून प्रथम दोन धावपटूंना रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येते. सर्व सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट देखील दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी आतापर्यंत दीड हजारच्या जवळपास नोंदणी झाली असून, स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जवळपास दोन हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही स्पर्धा ५ कि.मी. फन रन, १० कि.मी., १६ कि.मी. जे.आर. फन रन व २१ कि.मी. या अंतरासाठी घेतली जाणार असून वयोगट तयार करून त्याप्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत.

या मॅरेथॉनच्या उद्‍घाटन सोहळ्याला पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांच्यासह मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. डाॅ. जयसिंग रावराणे यांनी या मॅरेथॉनची संकल्पना विषद केली. रूपेश तेली व शिवप्रसाद राणे यांनी भर पावसात ही मॅरेथॉन होत असून, जिल्हावासियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करीत, २०० डाॅक्टर्स या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news