

कुडाळ : कुडाळ येथे नारळीपौर्णिमे निमित्त गुरुवारी सायंकाळी शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र रिक्षा रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शहरातील मुख्य बाजारपेठेतून भंगसाळ नदीपर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलींमध्ये दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रिक्षा व्यावसायिकांनी सहभाग घेतला. रॅलीनंतर भंगसाळ नदीपात्रात मानाचे नारळ अर्पण करून नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
शिंदे शिवसेनेच्या रिक्षा रॅलीत आ. नीलेश राणे, तर ठाकरे शिवसेनेच्या रॅलीत माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. दोन्ही रॅलींमध्ये सजविलेल्या रिक्षांवर पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. घोषणाबाजी करीत आपापल्या पक्षाच्या समर्थनार्थ वातावरण निर्मिती करण्यात आली. रॅलीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना कार्यालय परिसरासह शहरात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान शहरात शांततेत रिक्षा रॅली पार पडली. प्रथमतः श्री देव पाटेश्वर मंदिरातील पालखीने निघालेला मानाचा नारळ प्रशासनाच्या उपस्थितीत भंगसाळ नदीपात्रात अर्पण करण्यात आला. त्यानंतर जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटना तसेच नागरिकांनीही नदीपात्रात श्रीफळ अर्पण केले.
शिंदे शिवसेनेची रॅली डीजेच्या तालावर!
पोस्ट ऑफिस चौक येथून शिंदे शिवसेना प्रणित रिक्षा संघटनेच्या रॅलीला सुरुवात झाली. नवीन एसटी डेपो परिसरात आ. नीलेश राणे रॅलीत सहभागी झाले. त्यांच्या हस्ते भंगसाळ नदीपात्रात नारळ अर्पण करण्यात आला. डीजेच्या तालावर निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने रिक्षांचा सहभाग होता. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जि.प. उपाध्यक्ष दादा साईल, जि. प. माजी अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, सभापती मिलिंद नाईक, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, जि.प. सदस्य दीपलक्ष्मी पडते व रूपेश कानडे आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.
ठाकरे शिवसेनेची ढोल-ताशांच्या गजरात रॅली!
ठाकरे शिवसेना शाखा येथून ठाकरे शिवसेना प्रणित रिक्षा संघटनेच्या रॅलीला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात शहरातून ही रॅली भंगसाळ नदीकाठी पोहोचली. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांच्या उपस्थितीत नदीपात्रात नारळ अर्पण करण्यात आला. तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट, शहरप्रमुख संतोष शिरसाट, जि.प. सदस्य गंगाराम सडवेलकर, बाळा पावसकर, अतुल बंगे, सत्यवान कांबळी, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.