

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतच्या मासिक बैठकीत नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये टीव्ही स्क्रीन बसविण्याच्या प्रश्नावरून सत्ताधारी भाजप गटातच शाब्दिक खडाजंगी होत हा वाद हमरीतुमरीवर गेला. अखेर सत्ताधारी भाजपच्या दोन व महाविकास आघाडीतून भाजपावासी झालेल्या सात अशा नऊ नगरसेवकांनी सभात्याग करत सत्ताधाऱ्यांनाच खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. एकूणच कुडाळ नगरपंचायत मध्ये भाजप विरुद्ध भाजप असा सामना रंगल्याचे चित्र दिसून आले.
कुडाळ नगरपंचायत मध्ये पंधरा दिवपूर्वीच सत्तांतर झाले. महाविकास आघाडीतील ठाकरे गटातील एक नगरसेविका फोडून आणत मविआची सत्ता उलथून लावत कुडाळ नगरपंचायतवर महायुतीची सत्ता आणली. त्यांनतर पुढच्या आठवड्याभरात भाजपने ठाकरे गटाचे पाच व काँग्रेसचे दोन असे मिळून सात सदस्य आपल्याकडे खेचून आणले, त्यामुळे कुडाळ नगरपंचायत मध्ये सहाजिकच सत्ताधारी भाजपचे सोळा नगरसेवक झाले. विरोधामध्ये केवळ ठाकरे गटाचे एकमेव नगरसेवक शिल्लक राहिले होते. अशा परिस्थितीत शुक्रवारी कुडाळ नगरपंचायतची पहिलीच मासिक सभा नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी व्यासपीठावर नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी अरविंद नातू , तर सभागृहात गटनेते विलास कुडाळकर, संध्या तेरसे, निलेश परब, उदय मांजरेकर, आफ्रिकन करोल, श्रेया गवंडे, अक्षता खटावकर, सई काळप, ज्योती जळवी, अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, श्रृती वर्दम, चांदणी कांबळी, सौ.नैना मांजरेकर, गणेश भोगटे, ठाकरे गटाचे मंदार शिरसाट सह खातेप्रमुख उपस्थित होते.
कुडाळ नगरपंचायत मध्ये नगराध्यक्षाच्या चेंबरमध्ये टीव्ही स्क्रीन बसवण्याबाबत चर्चा सुरू झाली. भाजपा नगरसेवक निलेश परब यांनी याला आक्षेप घेतला. यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी नगरपंचायत मध्ये अभ्यागतांना आपल्या कर्मचाऱ्यांकडून चांगली सेवा दिली जात नाही, जेष्ठांना थांबवून ठेवले जाते असे सांगून आपल्याला टिव्ही स्क्रीन का आवश्यक आहे? याबाबत माहिती दिली मात्र निलेश परब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यावरून निलेश परब व प्राजक्ता बांदेकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी सुद्धा या वादात उडी घेत प्रत्येक विषयात तुम्ही सदस्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करतात, सदस्यांना बोलू देत नाही हे चालणार नाही, असे म्हणत अध्यक्षांना खडे बोल सुनावण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक अभिषेक गावडे यांनी किरण शिंदे यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांच्या बाजूने किल्ला लढवला. हा शाब्दिक वाद एवढा वाढला की नुकतेच भाजपवासी झालेल्या उपनगराध्यक्ष किरण शिंदे,उदय मांजरेकर, आफ्रिकन करोल,श्रेया गवंडे,अक्षता खटावकर,सई काळप,ज्योती जळवी या सात नगरसेवकांसह भाजपच्या चिन्हावर निवडणूक आलेल्या संध्या तेरसे व निलेश परब यासह एकूण नऊ नगरसेवकांनी सभात्याग केला.
आपल्याला विकास कामे करायची आहेत, जे बाहेर जातील त्यांना आम्ही थांबू शकत नाही; पण विकासकामे थांबता कामा नये असे यावेळी नगराध्यक्षा सौ.बांदेकर यांनी सांगितले. नऊ नगरसेवकांनी सभात्याग केल्यानंतर नगराध्यक्षांच्या दालनात टीव्ही स्क्रीन, रस्ता दुतर्फा साईट पट्टी भरण्याबाबतसह अन्य ठराव सभागृहात मंजूर करून घेतले.
खड्डे भरण्याच्या प्रश्नावरुन अध्यक्षा बांदेकर व सौ.तेरसे यांच्यात शाब्दिक खटके उडाले.तसेच शाब्दिक खडाजंगीचा व्हिडिओ नगरसेवक संध्या तेरसे यांनी शूटिंग केल्यावरून सुद्धा सौ.बांदेकर व सौ.तेरसे या दोघांमध्ये वाद झाला.यावेळी अध्यक्षांनी सौ.तेरसे यांना शुटिंग केलेला व्हिडिओ डिलीट करण्यास भाग पाडले. एकूणच कुडाळ नगरपंचायत मध्ये सत्तातरांनंतरची पहिलीच बैठक वादळी ठरली.
कुडाळ नगरपंचायतच्या सभेत तासाभरानंतर विरोधी ठाकरे गटाचे एकमेव नगरसेवक मंदार शिरसाट सभागृहात आले, यावेळी नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर यांनी त्यांचे हस्तांदोलन करत स्वागत केले. मंदार शिरसाट यांनी महायुतीचे तुम्ही १६ नगरसेवक आहात, त्यामुळे विकास कामात आता कोणतीही अडचण येता कामा नये असं माझं मत आहे. तुम्ही एकत्र येऊन निर्णय घ्या अशी अध्यक्षांना यावेळी ठाकरे गटाचे एकमेव नगरसेवक मंदार शिरसाट यांनी विनंती केली.