

(छाया : राजाराम परब)
कुडाळ : कुडाळ शहरातून जाणार्या कुडाळ-मालवण मुख्य रस्त्यावर नाबरवाडी रेल्वे पुलाखालील रस्ता धोकादायक बनला आहे. याठिकाणी सगळीकडे खड्डेच खड्डे असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कुडाळ- मालवण हा मुख्य रस्ता असतानाही प्रशासन याकडे डोळेझाक करत असून याठिकाणी अपघाताची मोठ्या अपघाताची प्रतीक्षा करत आहे का? असा सवाल वाहन चालक व प्रवाशांमधून विचारला जात आहे.
कुडाळ -मालवण मार्गांव नाबारवाडी येथे रेल्वे ब्रिज आहे. या रेल्वे ब्रिजचे पाणी रस्त्यावर पडत असल्याने या ठिकाणी पुलाखाली मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशी स्थिती या ठिकाणी वारंवार निर्माण होत आहे. तरीही संबंधित प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. सद्यस्थितीत ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
या ठिकाणी वाहनचालकांना रस्ता शोधावा लागत आहे, एवढी गंभीर परिस्थिती आहे. रेल्वेपुलामुळे या ठिकाणी रस्ता काही प्रमाणात अरुंद बनला आहे. अशा स्थितीत या ठिकाणी निर्माण झालेली धोकादायक स्थिती अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. या ठिकाणी रेल्वे ब्रिजाला रेल्वे मार्गावर कोणताही संरक्षक कठडा नसल्याने अनेकदा रेल्वे जात असताना रेल्वे ट्रॅक वरील दगड खाली पडतात. यामुळेही वाहनचालकांंच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रेल्वे प्रशासनाने ट्रकच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडा उभारण्याची मागणी होत आहे. अशा अनेक समस्यांमुळे कुडाळ -मालवण या पर्यटन मार्गावरील नाबारवाडी रेल्वे ब्रिज भाग डेंजर झोन बनला आहे. येथील या समस्यांची संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाहनचालक व स्थानिकांनी दिला आहे.