

कुडाळ : मान्सून महोत्सव उदघाटन प्रसंगी उपस्थित रूपेश पावसकर. सोबत राजू पाटणकर, सुनील धुरी व अन्य. (छाया : काशिराम गायकवाड, कुडाळ)
कुडाळ : लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित मान्सून महोत्सव- 2025 ला येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे दिमाखात प्रारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरूवारी ’महायोध्दा इरावन’ हा संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात उत्तरोत्तर रंगला. शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी सायं. 6.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी नाट्य क्षेत्रामधील आघाडीच्या कलाकारांचा सहभाग असलेला संयुक्त दशावतारचे ’थाळी हरण’ हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. या महोत्सवाचे यंदाचे 13 वे वर्ष आहे.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने महोत्सवाचे आणि श्रीफळ वाढवून रंगमंचाचे उदघाटन करण्यात आले. लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर, ग्रुपचे सर्वेसर्वा राजेश म्हाडेश्वर, सामाजिक कार्यकर्ते रूपेश पावसकर, कवठी युवक मित्रमंडळ (मुंबई)चे अध्यक्ष संजय करलकर, हौशी क्रिकेट असो.चे तालुकाध्यक्ष सुनील धुरी, दशावतारी कलावंत बाबा मेस्त्री व सिध्देश कलिंगण, गजानन गावस (गोवा), प्रसाद परब (गोवा), रात्र दशावतार पेजचे अमोल राणे, दिपक भोगटे, स्वरूप सावंत, संजय मांजरेकर, सदा अणावकर, सिद्धेश वर्दम, नागेश नार्वेकर, अनुप ओटवणेकर, सिद्धेश बांदेकर, आदींसह लाजरीचे सभासद आणि नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी लाजरी क्रिकेट ग्रुपच्या उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. राजू पाटणकर व सहका-यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सुत्रसंचलन राजा सामंत व बादल चौधरी यांनी केले.