

कुडाळ : कुडाळ शहरातील पोस्ट ऑफीस चौक येथे डंपरच्या धडकेत पादचारी नागरिकाला गंभीर दुखापत झाली. सुभाष बाबू कुबल (वय 67, रा.दाभोली तेलीवाडी, ता.वेंगुर्ले) असे जखमी पादचारी नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने नजिकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी तातडीने गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास झाला.
शहरातील पोस्ट ऑफीस चौकात रस्ता ओलांडणारे पादचारी सुभाष कुबल यांना गोवा येथून मालवणच्या दिशेने जाणा-या डंपरची धडक बसली. यात कुबल रस्त्यावर पडले, त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. स्थानिक रिक्षा व्यावसायिक आणि नागरिकांनी त्यांना नजिकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले. मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने गोवा बांबोळी येथे हलविण्यात आल्याची माहीती पोलिस व ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी दिली.
अपघाताची माहीती मिळताच शहरातील राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनींसह नागरिकांनी रूग्णालयात धाव घेत, जखमीला उपचारासाठी तसेच नातेवाईकांचा शोध घेण्यास सहकार्य केले. घटनास्थळी कुडाळ पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला तसेच डंपरसह चालकाला ताब्यात घेत, पुढील कार्यवाहीसाठी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.