

कणकवली : मुंबई ते मडगाव जाणार्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून पडल्याने राहूल संतोष सावर्डेकर (29, रा.वरचीपेठ, कुटरे, ता.चिपळूण) हा युवक डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला रेल्वे पोलिसांनी उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. हा अपघात मंगळवारी सकाळी 9 ते 9.30 वा.च्या सुमारास घडला. याबाबतची खबर रेल्वेचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक दुर्गेश यादव यांनी कणकवली पोलिसांत दिली.
ते मंगळवारी रेल्वे सुरक्षा बल कणकवली ऑफिस येथे हजर असताना कणकवली स्टेशन मास्तर अनंत चिपळूणकर यांनी त्यांना ऑटो फोन करून कोकणकन्या एक्सप्रेसमधून कोणीतरी व्यक्ती मैल किमी क्रमांक 311/2 याठिकाणी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडल्याचे कळवले. त्याठिकाणी जावून पाहिले असता एक इसम रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जखमी अवस्थेत दिसला. त्याच्या डोक्याच्या पाठीमागे गंभीर दुखापत झाली होती. 108 रुग्णवाहिकेमधील डॉक्टरांनी तेथे पोहोचून तपासणी केली असता तो बेशुध्द असल्याचे सांगितले.
त्याच दरम्यान कणकवली पोलिस तेथे पोहोचले. जखमीला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणून तपासले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. त्याच्या पॅन्टच्या खिशात पाकिट व मोबाईल आढळून आला. पाकिटात आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, एटीएम आदी कागदपत्रे आढळून आली. आधारकार्डवर त्याचे नाव राहूल संतोष सावर्डेकर असे होते. त्यामुळे त्याची ओळख पटली. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.