Konkan Railway : कोकण रेल्वेच्या गाड्या ४ ते ९ तास विलंबाने

'उन्हाळी विशेष' गाड्यांमुळे वाहतुकीचे नियोजन कोलमडले एकेरी रेल्वे मार्गाचा फटका; प्रवाशांना नाहक आर्थिक व शारीरिक मनस्ताप
Konkan Railway
Konkan Railway
Published on
Updated on

मळगांव : कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी हंगामासाठी रेल्वे शासनाने विशेष गाड्या सोडून रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.परंतु कोकण रेल्वे मार्गावरून नियमित धावणाऱ्या गाड्या तसेच उन्हाळी सुट्टीसाठी सोडलेल्या विशेष रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक रविवार व सोमवारी कोलमडले. या मार्गवरील सर्वच गाड्या सरासरी ४ ते ९ तासांच्या विलंबाने धावत होत्या. यामुळे कोकणात येणाऱ्या व कोकणातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रेल्वे शासनाच्या नियोजनाअभावी कोलमडलेल्या वेळापत्रकांचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावर सुरुवातीच्या कालावधीत कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गाच्या देखभाल दुरुस्तीची कामे प्रशासनाने हाती घेतली. त्यामुळे रेल्वेगाड्या १५ ते १६ तास विलंबाने तर काही रेल्वे गाड्या ५ ते ६ तास विलंबाने धावत होत्या. आता कोकण रेल्वे प्रशासनाने सोडलेल्या विशेष गाड्या आणि नियमित गाड्यांमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. त्याचा नाहक त्रास रेल्वे प्रवाशांना सोसावा लागत आहे. नियमित तसेच विशेष रेल्वे गाड्या ४ ते ९ तासाच्या विलंबाने धावत आहेत. परिणामी कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा त्या त्या रेल्वे स्थानकांत खोळंबा झाला होता.

रविवारी गाडी क्र.११०९९ एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस उशिराने आली. तीच परतीचह गाडी क्र.१११०० मडगांव - एलटीटी- एक्स्प्रेस तब्बल ९ तास विलंबाने धावली. गाडी क्र. २०११२ कोकणकन्या एक्स्प्रेस ३ तास विलंबाने तर सोमवारी गाडी क्र. १०१०३ मांडवी एक्स्प्रेस ४ तास विलंबाने धावली. कोकण रेल्वे मार्गावर दररोज सरासरी ७६ रेल्वेगाड्या आणि मालवाहू गाड्या धावतात. त्यात विशेष रेल्वेगाड्या समाविष्ट झाल्याने एकेरी मार्गावरून रेल्वेगाड्या, विशेष रेल्वेगाड्या आणि मालगाड्या चालवणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक रेल्वेगाड्या विलंबाना धावत असल्याचे कोकण रेल्वेचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

रेल्वे स्थानकांवर गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासह अन्य मूलभूत सुविधा न मिळाल्‍याने रेल्वे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त झाली. रेल्वे तिकिटांसाठी हजारो रुपये मोजूनही वेळेवर रेल्वेसेवा मिळत नसल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहेत. वेळेचा अपव्यय व कामकाजाचे वेळापत्रक बिघडून आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने प्रवाशांत तीव्र संताप व्यक्त होत होता.

रेल्वे गाड्या 3 ते ९ तास उशिराने धावतात. उन्हाळी सुट्ट्या आणि प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे कोकण रेल्वे मार्गावर आधीच ताण आहे. त्यामुळे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. सर्व रेल्वेगाड्या थेट मडगावपर्यंत चालवण्याचा कोकण रेल्वे प्रशासनाचा अट्टहास हे या विलंबामागील प्रमुख कारण आहे. तसेच कोकणकन्या एक्स्प्रेसला विनाकारण अतिजलदचा दर्जा दिल्याने वेळापत्रकावर अतिरिक्त ताण येत असल्याचा दावा रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news