Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले !

मे महिन्याच्या गर्दीत प्रवाशांचे प्रचंड हाल; गाड्या ५ तास उशिराने
Konkan Railway |
कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले !
Published on
Updated on

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे विस्कळीत झाले असून, हजारो प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे गाड्यांना आधीच प्रचंड गर्दी असताना, आता ३ ते ५ तासांच्या विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांच्या मनःस्तापात भर पडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव रोड आणि कणकवली स्थानकांदरम्यान अंडरपास (भुयारी मार्ग) बांधकामासाठी ३० एप्रिल आणि १ मे रोजी विशेष 'ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक' घेण्यात आला होता. या तांत्रिक कामामुळे विस्कळीत झालेली संपूर्ण मार्गावरील वाहतूक अद्याप पूर्वपदावर आलेले नाही.

कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे प्रमुख गाड्यांच्या वेळा रेल्वे प्रशासनाकडून बदलण्यात आल्या आहेत. यामध्ये मांडवी एक्स्प्रेस (२ मे) रोजी सीएसएमटीवरून सुमारे ३ तास उशिराने सुटली. जनशताब्दी एक्स्प्रेस मडगाववरून तब्बल ५ तास २४ मिनिटे उशिराने मुंबईला पोहोचली. कोकण कन्या एक्स्प्रेस २ तास ४८ मिनिटे उशिराने मुंबईत पोहोचली.

एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस दोन्ही बाजूंनी सुमारे ५ तास उशिराने धावत आहे. दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस १ तास ४८ मिनिटे उशिराने सावंतवाडीला पोहोचली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असले, तरी वाहतूक नेमकी कधी सुरळीत होईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

प्रवाशांचे हाल हाल!

मे महिन्याची सुट्टी आणि सलग सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचा महापूर लोटला आहे. शनिवारी अवघ्या तीन तासांच्या अंतरात सुटलेल्या सात गाड्यांमध्ये झालेली अभूतपूर्व गर्दी पाहता आरक्षित डब्यात शिरणे कठीण झाल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

७ गाड्या, हजारो प्रवासी आणि प्रचंड गोंधळ

केवळ जनरलच नव्हे, तर स्लीपर आणि चक्क एसी डब्यांमध्येही पाय ठेवायला जागा नव्हती. ज्या प्रवाशांनी महिनाभर आधी आरक्षण केले होते, त्यांनाही आपल्या हक्काच्या जागेवर बसणे मुश्कील झाले. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता सावंतवाडीपर्यंत एक स्वतंत्र जलद रेल्वे सेवा कायमस्वरूपी सुरू करावी, अशी ही मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news