Sindhudurg Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; अनेक गाड्या १ ते ७ तास उशिराने

प्रवाशांचे प्रचंड हाल; मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेसला मोठा फटका
Konkan Railway
Konkan Railway pudhari photo
Published on: 
Updated on: 

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरील विस्कळीतपणाचा फटका आज पुन्हा एकदा हजारो प्रवाशांना बसला आहे. गाडी क्रमांक २०१११ कोकणकन्या एक्स्प्रेससह अनेक प्रमुख गाड्या तब्बल १ ते ७ तास उशिराने धावत असल्याने कोकण रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक पार कोलमडून गेले आहे. गाड्यांच्या या अक्षम्य विलंबामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे, विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांचे अतोनात हाल होत असून, प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कोणती गाडी कितीने उशिरा? मिळालेल्या माहितीनुसार, मंगला एक्स्प्रेस आणि वंदे भारत एक्स्प्रेस (१ तास), एर्नाकुलम-ओखा एक्स्प्रेस (१ तास ३० मिनिटे), जनशताब्दी एक्स्प्रेस (१ तास ३० मिनिटे), तर तेजस एक्स्प्रेस (२ तास १५ मिनिटे) उशिराने धावत आहे. दुसरीकडे कोकणकन्या एक्स्प्रेस (३ तास), मांडवी एक्स्प्रेस (३ तास ४० मिनिटे), एर्नाकुलम एक्स्प्रेस (५ तास) आणि एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस तब्बल (७ तास) उशिराने धावत असल्याने स्थानकांवर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.

गाड्यांच्या ‘पेअरिंग’मुळे गोंधळात भरगाड्या उशिरा धावत असल्याचा परिणाम परतीच्या प्रवासावरही झाला आहे. गाडी क्रमांक २०११२ मडगाव-कोकणकन्या एक्स्प्रेस अतिशय उशिराने दादर स्थानकात पोहोचली. हीच रॅक पुढे ‘मांडवी एक्स्प्रेस’ म्हणून मडगावच्या दिशेने रवाना होत असल्याने, ही गाडी कोकणातील स्थानकांवर पोहोचेपर्यंत सायंकाळचे ७ ते ८ वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चाकरमान्यांवर आर्थिक भुर्दंड

गाड्या ३ ते ४ तास उशिराने पोहोचणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची प्रचंड अडचण झाली आहे. स्थानकावर उतरल्यानंतर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसची वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे रात्रीच्या वेळी नाईलाजाने महागड्या रिक्षा किंवा खाजगी वाहने करून प्रवास करावा लागणार आहे.

रेल्वेच्या विलंबाचा मानसिक त्रास आणि त्यातच रात्रीच्या प्रवासाचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यामुळे चाकरमानी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून या उशीराबद्दल अद्याप कोणतेही ठोस कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. वेळापत्रक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले, तरी वारंवार होणाऱ्या या गोंधळामुळे आणि विस्कळीत कारभारामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.