

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास जून महिन्यापासून अधिकृतपणे मंदावणार आहे. कोकण रेल्वेवर १५ जून ते २० ऑक्टोबरदरम्यान पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. घाटमार्ग तसेच संभाव्य दरड कोसळण्याच्या भीतीमुळे प्रवासी सुरक्षिततेच्या कारणास्तव कोकण रेल्वेवर वेगमर्यादा लागू करण्यात येते. त्यामुळे वेळांमध्ये बदल होतो. पावसाळी वेळापत्रकामुळे कोकणकन्या, तेजस, जनशताब्दी, मांडवी, मत्स्यगंधा आणि मंगळुरू एक्स्प्रेस यांच्या प्रवासवेळेवर परिणाम होणार आहे.
मुंबई-गोवा रेल्वेमार्गावरील गाडी क्र.२२२२९/३० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव, वंदे भारतसह अन्य प्रमुख गाड्या पावसाळी वेळापत्रकात आठवड्यातून तीन दिवस धावणार आहेत. सध्या वंदे भारत सहा दिवस धावत आहे. प्रतिष्ठित (१२४३१/२) हजरत निजामुद्दीन-तिरुअनंतपुरम सेंट्रलसह एकूण ८८ रेल्वेगाड्यांवर पावसाळी वेळापत्रकाचा परिणाम होणार आहे. यात जनशताब्दी, तेजस, दुरांतो, मत्स्यगंधा, हमसफर, मांडवी, मरूसागर, कोकणकन्या, तुतारी, गोवा संपर्क क्रांती या गाड्यांचा समावेश आहे.