Konkan Railway | ‘कोकण रेल्वे’ कडून खासगी जागेत अतिक्रमण!
मडुरा : मडुरा रेल्वे स्थानकासाठी संपादित जमिनी पलीकडे जात कोकण रेल्वे प्रशासनाने शेतकर्यांच्या खासगी जमिनीवर अतिक्रमण केल्याचे भूमिअभिलेख विभागाच्या मोजणीत सिद्ध झाले आहे. सदर अतिक्रमण हटवण्यात कोरे प्रशासन टाळाटाळ करत असल्याने संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी कोकण रेल्वेचे वरिष्ठ क्षेत्रीय अभियंता रवींद्र पाटील यांना जाब विचारला. याबाबत सुरुवातीला आडमुठी भूमिका घेणार्या अधिकार्यांनी कागदपत्रे पाहून नंतर मात्र नरमाई घेत सामंजस्यातून तोडगा काढण्याचे मान्य केले.
भूमिअभिलेखच्या अधिकार्यांनी या जागेची मोजणी केली असता, शेतकर्याचा आरोप खरा असल्याचे समोर आले. कोकण रेल्वेने हद्दीबाहेर सुमारे 39 गुंठे जमिनीवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. अतिक्रमित जमिनीतील रस्ता काढून जमीन शेतकरी वालावलकर यांच्या ताब्यात देण्यात ‘कोरे’ प्रशासन टाळाटाळ करीत आहे.
‘कोरे’चे वरिष्ठ क्षेत्रीय अभियंता रवींद्र पाटील यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांना स्थानिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. त्यांनी ही ‘कोरे’ प्रशासनाची चूक असल्याचे लक्षात येताच त्यांनी सामंजस्याने तोडगा काढण्याचे मान्य केले. याबाबत आपण सार्व. बांधकाम विभाग, सावंतवाडीच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

