Metro Pilot : कोनाळ गावची सुकन्या बनली मेट्रो पायलट!

ग्रामीण भागातील मुलीचे यश काैतुकास्पद व प्रेरणादायी
Metro Pilot
कोनाळ गावची सुकन्या बनली मेट्रो पायलट!
Published on
Updated on

रत्नदीप गवस

दोडामार्ग : आपले आई-वडील आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी रात्र दिवस काबाड कष्ट करत असतात, याची जाणीव प्रत्येक मुला- मुलीला झाली की त्या मुलाचे, मुलीचे भविष्य यशस्वी होणारच, अशीच कथा आहे एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली आणि दशावतार कलाकाराची सुकन्या असलेली सेजल सुभाष लोंढे (२३) हिची. तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर मुंबई मेट्रो -३ या प्रकल्पात मेट्रो पायलट म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. अगदी कमी वयात मोठ्या पदापर्यंत मारलेली मजल निश्चितच प्रेरणादायी असून तिच्या या गगनभरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दोडामार्ग तालुक्यातील कोनाळ गावातील दशावतार कलाकार सुभाष लोंढे गेली ३२ वर्षे कोकणची लोककला असलेल्या दशावतार क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिका साकारत आहेत. नारद या भूमिकेसाठी ते रसिकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. दशावतार कलेतून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच ते आपला संसार चालवतात. पत्नी, दोन मुली, मुलगा असा त्यांचा परिवार आहे. त्यांची तीनही मुले अभ्यासात हुशार आहेत. यामुळे त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी लागतील ते कष्ट घेण्याची तयारी वडीलांची आहे. दुसरीकडे आपले वडील आपल्या साठी रात्र-दिवस काबाड कष्ट करतात, याची जाणीव मुलांनाही आहे. हीच जाणीव ठेवून मनात ठेवून मोठी मुलगी सेजल हिने जिद्द व परीश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

सेजलचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा कोनाळ तर माध्यमिक शिक्षण एम. आर. नाईक विद्यालय कोनाळकट्टा येथे झालेे. सन २०१८ च्या शालांत परीक्षेत तिने ८९ टक्‍के गुणांसह शाळेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच या वर्षीची आदर्श विद्यार्थिनी म्हणून पुरस्कार प्राप्त केला.

या नंतर कुडासे ज्युनियर कॉलेजमधून तिने विज्ञान शाखेतून ५३ टक्‍के गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे मालवण तंत्र निकेतनमधून तिने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर पुणे येथे टाटा मोटर्स मध्ये १ वर्षे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. मेट्रो पायलटसाठी आवश्यक परिक्षा पास झाली. या नंतर एक वर्ष दिल्ली येथे प्रशिक्षण पूर्ण केले. सहा महिने स्टेशन मास्तर म्हणून मेट्रोत काम केले. हा सर्व खडतर प्रवास पूर्ण करून सेजल मेट्रो -3 मध्ये पायलट म्हणून रुजू झाली आहे. आपल्या लेकीने अथक परिश्रम घेत मिळवलेली नोकरी पाहून वडील सुभाष लोंढे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. मी कुटुंब चालवण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली, त्याचे सेजल हिने चीज केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लवकरच ती गावी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news