

मालवण : वायरी येथील एका छोट्या स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कसबा सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील श्रेणीक मिलिंद टाकळे (२५) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
कागल येथील दहा मित्र शनिवारी पर्यटनासाठी मालवणमध्ये आले होते. ते वायरी येथील एका रिसॉर्टमध्ये उतरले. रविवारी दुपारी काही मित्र स्विमिंगचा आनंद लुटत होते. छोट्या स्विमिंग पूलमध्ये लहान मुलांसाठी आनंद लुटण्याच्या चार फुटाच्या भागामध्ये श्रेणीकने ८ ते १० फुटावरून उडी घेतली. यावेळी श्रेणीकचे डोके थेट पुलाच्या तळाला आपटले.
त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. त्याच्या मित्रांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. श्रेणीक अविवाहित होता. त्याच्या कुटुंबीयांना दुर्घटनेची माहिती देण्यात आली. रविवारी रात्री उशिरा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनेची माहिती घेतली.