

नांदगाव : महाराष्ट्रासह परराज्यातही मोठा भक्तजन असलेली व ‘मटण-भाकरी’च्या प्रसादासाठी प्रसिद्ध असलेली नांदगाव येथील जागृत देवस्थान श्रीदेव कोळंबा देवाची जत्रा रविवारी 11 मे रोजी होत आहे. या जत्रोतस्वाची जय्यत तयारी सुरू आहे. भक्तांना कमीत कमी वेळेत दर्शन, वाहन पार्किंग, पिण्याचे पाणी, प्रसाद वाटप, मंडप व विद्युत रोषणाई आदींची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत नांदगाव तिठा परिसरातील श्री देव कोळंबा हे एक जागृत व नवसाला पावणारे देवस्थान म्हणून सर्वदूर परिचीत आहे. यात्रे निमित्त मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला असून मंडप उभारणी, विद्युत रोषणाई, नवसफेड, नवीन नवससाठी येणार्या भक्तांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था, दर्शन रांग यासाठी मंडळाने नियोजन केले आहे. शिवाय भाविकांच्या वाहनांची पार्कींग व्यवस्थाही करण्यात आली आहे. रविवारी पहाटेपासून श्री देव कोळंबा जत्रोत्सवास सुरूेवात होणार आहे.
यावर्षी आर्कषक विद्युत रोषणाई व मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, प्रसादाच्या रांगा, मान्यवर कक्ष, स्वागत कमान, आरोग्य पथक, आदींसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हावासीयांबरोबर मुंबईकर चाकरमानी, राज्य व परराज्यातील हजारो भाविक या जत्रोत्सवाला हजेरी लावतात. यासाठी जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
श्री देव कोळंबा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये यांच्यासह सहकारी, ग्रामस्थ मेहनत घेत आहेत. या जत्रेला उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
दुपारनंतर या जत्रेला भाविकांची उच्चांकी गर्दी होते. दुपार नंतर येणार्या प्रत्येक भाविकाला श्री देव कोळंबाचा प्रसाद म्हणून ‘मटण-भाकरी’ दिली जाते. या प्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. प्रसाद म्हणून ‘मटण- भाकरी’चे वाटप हे या जत्रेचे वेगळेपण आहे.