Karul Ghat Landslide : करूळ घाटात दरड कोसळली; दोन तास वाहतूक ठप्प, घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा

File Photo
File Photo
Published on
Updated on

वैभववाडी : करूळ घाटात शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्‍याच्या सुमारास भलीमोठी दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवून प्रथम एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर रस्त्यावर पडलेले महाकाय दगड फोडून सायंकाळी उशिरा वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात आली.

गेल्या चार-पाच दिवसांपासून वैभववाडी तालुक्यासह सह्याद्रीपट्ट्यात दमदार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे गगनबावड्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर करूळ घाटात अचानक मोठी दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली.

घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहायक अभियंता पवन पाटील घटनास्थळी दाखल झाले. घाट मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या वेल्हाळ कंपनीच्या जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.

दरडीसोबत रस्त्यावर दोन महाकाय दगडही कोसळले होते. हे दगड यंत्राच्या साहाय्याने फोडून हटविण्यात आले. तहसीलदार सूर्यकांत पाटील आणि पंचायत समितीचे सभापती सिद्देश रावराणे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

घाटातील धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे   

यावर्षी करूळ घाटात दरड कोसळण्याची ही पहिलीच घटना आहे. दरड कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेऊन शनिवारी केंद्र सरकारच्या विशेष तज्ज्ञ पथकाकडून घाटातील धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे केला जाणार आहे. या पाहणीनंतर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news